PAK vs SL Asia Cup 2025: आशिया कप २०२५ मधील सुपर-४ फेरीचा तिसरा सामना पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात खेळवण्यात आला. पाकिस्तानने हा सामना ५ विकेट्सने जिंकत पॉइंट टेबलमध्ये आपले खाते उघडले. या सामन्यात पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज अबरार अहमद आणि श्रीलंकेचा वानिंदु हसरंगा यांच्यातील वादग्रस्त सेलिब्रेशनने सर्वांचे लक्ष वेधले. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. IND vs PAK Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा सामना होणार? फायनलमध्ये तिसऱ्यांदा भिडण्याची शक्यता

हसरंगाने अबरारला त्याच्याच शैलीत दिले उत्तर

हा संपूर्ण प्रकार श्रीलंकेच्या फलंदाजीदरम्यान घडला. पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज अबरार अहमदने श्रीलंकेचा फलंदाज वानिंदु हसरंगाला क्लीन बोल्ड केले. त्यानंतर, अबरारने हसरंगाला ‘फोन कॉल’ करण्याचा इशारा करत खास शैलीत सेलिब्रेशन केले. यानंतर, पाकिस्तानच्या फलंदाजीदरम्यान हसरंगाला बदला घेण्याची संधी मिळाली. डावाच्या सातव्या षटकात हसरंगाने पाकिस्तानचा सलामीचा फलंदाज सॅम अयुबला क्लीन बोल्ड केले.

त्यानंतर, हसरंगाने अबरारची नक्कल करत त्याच प्रकारे सेलिब्रेशन केले. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, 'जैसे को तैसा' असे म्हणत चाहते हसरंगाची प्रशंसा करत आहेत. सामन्यात दोघांनीही चांगली गोलंदाजी केली. हसरंगाने ४ षटकांत २७ धावा देत २ बळी घेतले, तर अबरार अहमदने ४ षटकांत फक्त ८ धावा देत १ बळी मिळवला.

पाकिस्तानने असा मिळवला विजय

प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने २० षटकांत ८ गडी गमावून १३३ धावा केल्या. श्रीलंकेकडून कामिंडू मेंडिसने सर्वाधिक ५० धावा केल्या, तर कर्णधार चरिथ असलंका २० धावांचे योगदान दिले. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने ३ बळी घेतले. हे सोपे लक्ष्य पाकिस्तानने १८ षटकांत गाठले. पाकिस्तानकडून फलंदाजी करताना मोहम्मद नवाजने सर्वाधिक ३८ धावा केल्या.