मोहम्मद शमी आणि हसून जहाँ (Photo Credits: Cricket Universe)

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) याच्या नावावर कोलकाता कोर्टाने घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणात सोमवारी अटक वॉरंट जारी केले आहे. कोर्टाने शमीला 15 दिवसांच्या आत आत्मसमर्पण करण्यास वेळ दिला आहे. शमी आणि त्याच्या भावाविरुद्ध त्याच्या पत्नी हसीन जहाँ (Hasin Jahan) हिने तक्रार दाखल केली होती. आणि या प्रकरणी आता न्यायालयाने शमी आणि त्याच्या भावाविरुद्ध अटक वॉरंट काढलं आहे. विंडीज दौऱ्यावरून परत येताच शमी आत्मसमर्पण करण्याची शक्यता आहे. यावर शमीची पत्नी हसीन यांनी न्यायालयीन यंत्रणेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. (क्रिकेटपटू मोहम्मद शमी याच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी, 15 दिवसांत कोर्टात हजर होण्याचे आदेश)

मोहम्मद शमीविरुद्ध अटक वॉरंट निघाल्यानंतर जहान म्हणाल्या की, “मी न्यायालयीन यंत्रणेची आभारी आहे. मी वर्षभरापासून न्यायासाठी लढा देत आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की शमी असा विचार करत आहे की जर तो एक मोठा क्रिकेटपटू असेल तर तो खूप शक्तिशाली आहे. तर असे नाही." हसीन जहांपुढे म्हणाल्या की, "जर मी पश्चिम बंगालची नसते, ममता बॅनर्जी आमच्या मुख्यमंत्री नसत्या तर मी इथे सुखरुप राहिलेले नसते. अमरोहा (उत्तर प्रदेश) पोलिसांनी मला आणि माझ्या मुलीला खूप त्रास देण्याचा प्रयत्न केला, परंतु देवाच्या कृपेने ते यशस्वी झाले नाहीत."

याआधी जहांने शमीच्या चॅटचे काही स्क्रिनशॉट फेसबुकवर शेअर केले होते. दरम्यान, या प्रकरणात बीसीसीआयने स्पष्टीकरण देत म्हटले आहे की, शमीवर केलेल्या आरोपांचे आरोपपत्र पाहिल्याशिवाय त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही. त्यामुळे शमीला सध्या काहिसा दिलासा मिळाला आहे. 2018 मध्ये हसीनने मोहम्मद शमीवर मारहाण केल्याचा, अन्याय आणि अत्याचार केल्याचा आरोप केला होता. तसेच हुंड्यासाठी पैसे मागितल्याचाही आरोप केला होता. शमीचे इतर महिलांसोबत अनैतिक संबंध असल्याचाही आरोप हसीनने केला होता. हसीनने शमीच्या कुटुंबीयांविरुद्ध हुंड्यासाठी कौटुंबिक हिंसाचार करण्यात असल्याची तक्रार दाखल केली होती.