भारतीय संघ गेले चार महिने करोना व्हायरसच्या धसक्याने घरात कैद आहे. मार्च महिन्यापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट ठप्प झाले आहे. भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) एक वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट पासून दूर आहे. आज धोनीचा वाढदिवस असल्याने धोनी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. धोनी आज 39 वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिवशी धोनीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आजी माजी क्रिकेटपटू, जाणकार, क्रीडापटू आणि इंडियन प्रीमिअर लीगमधील (IPL) संघाकडून धोनीला शुभेच्छा मिळत आहेत, त्यात मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) धोनीला हटके अंदाजात शुभेच्छा दिल्या. मुंबई पोलिसांनी धोनीचा वाढदिवस आज क्रिएटिव्ह पोस्टद्वारे साजरा केला. आपल्या फॉलोअर्सला सामाजिक अंतराबाबत महत्त्वपूर्ण संदेश देत मुंबई पोलिसांनी कॅप्टन कूलला शुभेच्छा दिल्या. (MS Dhoni Birthday: '2 वर्ल्ड कप, चॅम्पियन्स ट्रॉफी, टेस्ट रँकिंगमध्ये पहिले स्थान मिळवून देणाऱ्याला काय गिफ्ट देणार?' एमएस धोनीसाठी केदार जाधवचं भावनिक पत्र)
त्यांनी एका स्टेडियमचा फोटो ट्वीट केला असून त्यावर क्रिकेट स्टंप, बॅट, बॉल आणि ग्लोव्हज तसेच त्यावर एमएसडी शब्द लिहिलेले आहेत. तथापि, त्यांनी एमएसडीच्या अक्षराला सामाजिक अंतराने जोडून एक क्लासिक ट्विस्ट दिले. धोनीच्या नावाऐवजी त्यांनी MSD चे फुल फॉर्म 'मेंटेन सोशल डेस्टिनेसिंग' (सामाजिक अंतराचे भान ठेवा) असे लिहिले. शिवाय, स्टंपवरील बेल्सला घराचा आकार येईल अशा ठेवल्या आहेत आणि नागरिकांना घरात सुखरूप राहण्याचा संदेशही दिला.
पाहा मुंबई पोलिसांचे ट्विट
Do it the ‘Mahi Way’ - Stay ‘Not Out’, Stay Cool & Stump #coronavirus
Happy Birthday, Captain Cool.#HappyBirthdayMahi #SocialDistancing pic.twitter.com/piH7jNFBIK
— Mumbai Police (@MumbaiPolice) July 7, 2020
एमएस धोनी अखेरीस न्यूझीलंडविरुद्ध 2019 वर्ल्ड कपच्या सेमीफायनल सामन्यात झळकला होता. न्यूझीलंडविरुद्ध त्या सामन्यातील पराभवानंतर धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून काही काळ विश्रांती घेण्याचं सांगितलं. ज्यानंतर धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा जोर धरू लागल्या पण, धोनीने आजवर आपल्या निवृत्तीच्या विषयावर स्पष्टपणे कोणतेही विधान केलेले नाही.