Wasim Jaffer (Photo Credits: PTI)

भारताचा माजी सलामीवीर वसीम जाफरने (Wasim Jaffer) शनिवारी, 7 मार्च रोजी क्रिकेटमधून निवृत्तीची (Retirement) घोषणा केली. अशाप्रकारे, त्याचा दोन दशकांमधील क्रिकेटप्रवास आज संपुष्टात आला. 42 वर्षीय जाफरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केलेली नसली तरी, घरगुती क्रिकेटमधील त्याची कारकीर्द उत्कृष्ट आहे. वसीम जाफरने 260 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 50.67 च्या सरासरीने 19,410 धावा केल्या आहेत. त्यात त्याने 57 शतके आणि 91 अर्धशतके झळकावली. नाबाद 314 धावा हा त्याचा सर्वोच्च स्कोअर होता. 2000 ते 2008 दरम्यान झालेल्या 31 कसोटी सामन्यांमध्ये त्याने भारताचे प्रतिनिधित्व केले आणि 1944 धावा केल्या. यामध्ये पाच शतके आणि 11 अर्धशतकांचा समावेश आहे.

आपल्या निवृत्तीबाबत जाफरने ट्वीटरवर माहिती दिली आहे. आपल्या निवेदनात तो म्हणतो, 'सर्वप्रथम मी अल्लाहचे आभार मानू इच्छितो ज्याने मला हा महान खेळ खेळण्याची प्रतिभा दिली. मला माझ्या कुटूंबाबद्दल, माझे पालक आणि भावांबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे, ज्यांनी मला हा खेळ एक व्यवसाय म्हणून निवडण्यास प्रोत्साहित केले. माझ्या पत्नीचेही आभार जिने भारतात आपले घर बनवले.' त्यानंतर त्याने आपले कोच, शिक्षक आणि आतापर्यंत ज्यांच्यासोबत खेळलो अशा सर्व कर्णधारांचे आभार मानले आहेत. पुढे त्याने बीसीसीआय, मुंबई क्रिकेट असोशिएशन व विदर्भ क्रिकेट असोशिएशनचेही आभार मानले आहेत.

आपल्या निवेदनात वसीमने सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली, अनिल कुंबळे, व्हीव्हीएस लक्ष्मण, वीरेंद्र सेहवाग आणि महेंद्रसिंग धोनी अशा खेळाडूंचाही उल्लेख केला आहे. शेवटी हा आपल्या फर्स्ट इनिंगचा शेवट असून, आता आपण सेकंड इनिंग खेळण्यास उत्सुक असल्याचे सांगितले आहे. समालोचक  म्हणून किंवा कोच म्हणून आपण क्रिकेटशी जोडले राहावे अशी इच्छा वसीमने व्यक्त केली आहे. (हेही वाचा: IND Vs SA ODI Series 2020: विराट कोहली, रोहित शर्मा संघाबाहेर? आता 'हा' खेळाडू करणार भारतीय संघाचे नेतृत्व)

दरम्यान, वसीम जाफरने 2006 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामन्यात डेब्यू केला होता. 2006 मध्ये याच सामन्यात प्रतिस्पर्ध्याविरुद्ध त्याने पहिला एकदिवसीय सामना खेळला होता. रणजी ट्रॉफीमध्ये 12,000 धावा करणारा तो पहिला फलंदाज आहे. त्याने आपल्या कारकीर्दीत बहुतेक वेळा मुंबईचे प्रतिनिधित्व केले. नंतर, तो विदर्भकडून खेळायला लागला. रणजी करंडकातील 150 सामने खेळणारा तो पहिला फलंदाज आहे.