
करोना व्हायरसच्या (Coronavirus) प्रादुर्भावाचा फटका जगभरातील क्रीडा विश्वाला बसला. 13 मार्च रोजी ऑस्ट्रेलियाच्या सिडनी क्रिकेट ग्राउंडवर ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड संघात वनडे सामना खेळवला गेला आणि त्यानंतर आयसीसीने खबरदारीचा उपाय म्हणून सर्व आंतरराष्ट्रीय सामने थांबवले. कोरोनाचा प्रभाव जगातील जवळपास सर्व देशांमध्ये पाहायला मिळाला. पण आता 117 दिवस म्हणजेच तब्बल 4 महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट आजपासून रुळावर येत आहे. इंग्लंड (England) आणि वेस्ट इंडिज (West Indies) टीममध्ये आजपासून तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाईल. मालिकेतील पहिला सामना साउथॅम्प्टनच्या द एजेस बाउल स्टेडियममध्ये खेळला जाईल. कोविड-19 (COVID-19) मुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनेही (ICC) नियमांमध्ये काही बदल केले आहेत जे मालिकेतील पहिल्या सामान्यापासून लागू होतील. जगभरातील क्रिकेट चाहते या कसोटी मालिकेची आतुरतेने वाट पाहत आहेत. मार्च महिन्यानंतर खेळली जाणारा हा पहिला कसोटी सामनादेखील असेल. हा सामना क्रिकेटशिवाय अन्य कारणांसाठी ऐतिहासिक ठरणार आहे. (ENG vs WI 1st Test Live Streaming: इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडीज पहिली टेस्ट भारतात कधी आणि कुठे पाहता येईल; लाइव्ह टेलिकास्ट, ऑनलाइन स्ट्रीमिंग)
भारतीय चाहते हा सामना 8 जुलै पासून दुपारी 3:30 वाजल्यापासून पाहण्यास सक्षम असतील. पण, त्याआधी आपण या सामान्यापासून Post-Coronavirus काळात लागू होणाऱ्या नियमांबद्दल जाणून घेऊया. आयसीसीचे काही नवीन नियम अशाप्रकारे आहेत:-
1- खेळाडू चेंडूवर लाळ वापरू शकणार नाहीत. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर हा नवीन नियम बनविण्यात आला आहे. जर एखाद्या गोलंदाजाने तसे केले तर त्याला अंपायरकडून चेतावणी मिळेल. दोन चेतावणीनंतरही असे झाल्यास, विरोधी संघाला पाच धावा दिल्या जातील. गोलंदाजाने हे हेतुपुरस्सर केले आहे की अनावधानाने झाले याचा निर्णय अंपायर घेतील. शिवाय, पुढचा चेंडू फेकण्यापूर्वी बॉल स्वच्छ करणे ही पंचांचीही जबाबदारी असेल.
2- सामन्यादरम्यान एखाद्या खेळाडूने कोविड-19 ची चिन्हे दर्शविली तर त्याच्या संघाला पर्यायी खेळाडू मिळू शकतो. दुखापतीनंतर संघाला पर्यायी खेळाडू मिळतो त्याप्रमाणे.
3- या सामन्यात स्थानिक अम्पीरांचा वापर केला जाईल. प्रवासी निर्बंध असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
4- संघांना प्रत्येक डावात अतिरिक्त डीआरएस देखील मिळेल.
5- सामना रिकाम्या स्टेडियममध्ये होईल. गर्दी जमण्यास मनाई असल्याने प्रेक्षकांना स्टेडियममध्ये जाण्यास मनाई आहे.
6- या सामन्यादरम्यान खेळाडूंना फक्त कोपऱ्याला स्पर्श करण्याची परवानगी दिली जाईल. खेळाडू विकेट साजरी करण्यासाठी हाय-फाईव्हचा वापर करू शकणार नाही.
7- स्टेडियमवर सॅनिटायझर ठेवण्यात आले आहे. जेथे वेळोवेळी खेळाडू आपले हात सॅनिटाइज करतील. खेळाडूंना सॅनिटायझरचा वापर करणे अनिवार्य असेल.
8- सामना सुरु होण्यापूर्वी संपूर्ण वातावरण सॅनिटाइज केले जाईल. शिवाय, खेळाडूंना केवळ हॉटेल ते स्टेडियम एवढाच प्रवास करण्याची परवानगी असेल.
9- टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये आयसीसीने टीशर्टच्या मागे खेळाडूंची नावं छापण्याची परवानगी दिली होती, मात्र पुढील एक वर्ष सफेद जर्सीच्या पुढील बाजूस नाव, नंबर आणि लोगो असेल.
या मालिकेत वेस्ट इंडिजने नेतृत्व जेसन होल्डर करेल, तर पहिल्या सामन्यात इंग्लंडचा नियमित कर्णधार जो रूटला आपल्या मुलाच्या जन्मामुळे पहिल्या सामन्याला मुकावे लागणार असेल. अशा स्थितीत यजमान संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी बेन स्टोक्सकडे देण्यात आली आहे.