मँचेस्टर (Manchester) येथील ओल्ड ट्रॅफर्डमध्ये (Old Trafford) खेळवण्यात आलेल्या इंग्लंड (England)-पाकिस्तानमधील (Pakistan) दुसऱ्या टी-20 सामन्यात 'मेन इन ग्रीन'ला पराभवाचा सामना करावा लागला असला तरी कर्णधार बाबर आझमने (Babar Azam) मात्र एका रेकॉर्ड बुकमध्ये आपल्या नावाची नोंद केली. टी-20 मध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि ऑस्ट्रेलिया मर्यादित षटकांचा कर्णधार आरोन फिंचसह (Aaron Finch) बाबर संयुक्त 1,500 धावा करणारा वेगवान फलंदाज ठरला. कोहली आणि फिंचप्रमाणेच बाबरने 39व्या डावात कामगिरी करून दाखवली. आंतरराष्ट्रीय टी-20 फॉर्मेटमध्ये कोहलीने आजवर सर्वाधिक धावांची नोंद केली आहे. त्याने आजवर 82 सामन्यात 2794 धावा केल्या आहेत तर भारताचा उपकर्णधार रोहित शर्मा 108 सामन्यांत 2773 धावाांसह दुसर्या स्थानावर आहे. किवी सलामी फलंदाज मार्टिन गप्टिल, पाकिस्तानचा शोएब मलिक आणि ऑस्ट्रेलियाचा डेविड वॉर्नर अनुक्रमे तिसऱ्या चौथ्या आणि पाचव्या स्थानी आहेत. (ENG Vs PAK 1st T20 Cancalled: पावसाच्या व्यत्ययामुळे इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील पहिला टी-20 सामना रद्द)
खेळाच्या सर्वात कमी स्वरूपात सर्वाधिक फलंदाजीच्या सरासरींमध्ये (किमान 500 धावा) अव्वल स्थान मिळवण्यात बाबर कोहलीच्या पुढे गेला. 44 चेंडूत 56 धावा करणाऱ्या बाबरची सध्या टी-20 मध्ये सरासरी 50.90 आहे, जी कोणत्याही खेळाडूंमध्ये सर्वाधिक आहे. यापूर्वी विराट कोहली 50.80 च्या सरासरीने प्रथम क्रमांकावर होता. तथापि, बाबरच्या (40) तुलनेत कोहलीने दुप्पट सामने (82) खेळले आहेत.
इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील दुसर्या टी-20 मॅचबद्दल बोलायचे झाले तर कर्णधार इयन मॉर्गनने अर्धशतक झळकावले आणि इंग्लंडला ओल्ड ट्रॅफर्ड येथे रविवारी दुसर्या टी-20 सामन्यात पाकिस्तानविरुद्ध पाच विकेटने विजय मिळवण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली. पाकिस्तानने 20 ओव्हरमध्ये चार बाद 195 धावा केल्या, परंतु इंग्लंडने पाच चेंडूशिल्लक असताना विजय मिळवला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. मॉर्गनने 33 चेंडूत 66 धावा फटकावल्या. पहिला सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. आता मालिकेतील अंतिम सामना 1 सप्टेंबर रोजी खेळला जाईल.