ENG vs IND: लॉर्ड्स कसोटीसाठी इंग्लंडची नवी चाल, 'या' अष्टपैलू खेळाडूचा संघात समावेश
England Team (Photo Credit: Twitter)

England Vs India 2nd Test: इंग्लंड विरुद्ध नॉटिंगहॅममध्ये खेळण्यात आलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने चांगली कामगिरी बजावून दाखवली. मात्र, पहिल्या कसोटीच्या अखेरच्या दिवशी भारताला 157 धावांची गरज असताना पावसामुळे हा सामना रद्द करावा लागला. ज्यामुळे भारताच्या हातातून विजय निसटला होता. त्यानंतर आता भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना येत्या 12 ऑगस्टपासून लॉर्ड्सच्या मैदानावर खेळण्यात येणार आहे. या कसोटीसाठी इंग्लंडच्या संघाने नवीन चाल खेळली आहे. इंग्लंडच्या संघाने अष्टपैलू खेळाडू मोईन अलीचा (Moeen Ali) संघात समावेश केला आहे.

इंग्लंडचा कर्णधार जो रूट वगळता मध्य क्रमाचे फलंदाज संघर्ष करताना दिसत आहेत. यामुळे संघाचे मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवूडने संघात बदल करण्याचे संकेत दिले होते. भारताविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात इंग्लंडचा संघ 183 धावांवर बाद झाला होता. त्यानंतर जो रूटच्या संयमी खेळीच्या जोरावर इंग्लंडच्या संघाने दुसऱ्या डावात 303 धावांपर्यंत मजल मारली होती. "अष्टपैलू बेन स्टोक्स आणि ख्रिस वोक्सच्या अनुपस्थिती मोईन अलीला परत बोलवण्याचा विचार केला जात आहे", असे सिल्वरवूड यांनी सोमवारी म्हटले होते. हे देखील वाचा- ICC WTC 2021-23 Points Table: नॉटिंगहम टेस्ट ड्रॉ झाल्यावर जो रूट संघाची ‘बल्ले-बल्ले’, टीम इंडियाला मिळाले इतके गुण

सिल्वर वडू म्हणाले होते की, लॉर्ड्स कसोटीसाठी मोईन अलीबाबत चर्चा केली जात आहे. मोईन अली एक उत्तम खेळाडू आहे. त्याने द हंड्रेड मध्ये चांगली कामगिरी बजावून दाखवली आहे. हा वेगळा फॉर्मेट असला तरी त्याने सोमवारी झालेल्या सामन्यात 23 चेंडूत अर्धशतक ठोकून बर्मिंगहॅम फिनिक्सला विजयाकडे नेल्याचे त्यांनी म्हटले होते.

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अली भारतासाठी डोकेदुखी ठरू शकतो. मोईनने आतापर्यंत इंग्लंडसाठी 61 कसोटी सामने खेळले आहेत. ज्यात त्याने 189 विकेट्स घेतल्या आहेत. मोईनची भारताविरुद्धची कामगिरीही चांगली राहिली आहे. त्याने मायदेशात भारताविरुद्ध एकूण 7 कसोटी सामने खेळले असून 31 विकेट घेतले आहेत. तसेच त्याने मायदेशात भारताविरुद्ध दोनदा 5 विकेट्सही घेतल्या आहेत. तर, यावर्षी फेब्रुवारीमध्ये झालेल्या चेन्नई कसोटी 8 विकेट्स घेतले आहे. अशा स्थितीत भारताच्या फलंदाजांना मोईनपासून सावध राहण्याची गरज आहे.