बेन स्टोक्स (Photo Credit: Getty)

विस्डेनने इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्सची (Ben Stokes) जगातील आघाडीचे क्रिकेटपटू म्हणून निवड केली आहे. ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटर एलिस पेरीलाही (Ellyse Perry) बुधवारी विस्डेन अ‍ॅलमॅनॅकने (Wisden Almanack) 2019 चे अग्रगण्य क्रिकेटपटू घोषित केले. यापूर्वी 2016 मध्ये हा पुरस्कार जिंकलेली पेरी दुसऱ्यांदा जिंकणारी पहिली महिला ठरली. दुसरीकडे, स्टोक्स 2005 मध्ये अँड्र्यू फ्लिंटॉफनंतर हा सन्मान प्राप्त करणारा पहिला इंग्लिश क्रिकेटपटू बनला. विस्डेनने यंदा सर्वाधिक धावा किंवा विकेट घेण्याच्या बाबतीत पुढे असलेल्या वर्षाच्या 5 क्रिकेटपटूंचीही घोषणा केली आहे. विस्डेनने ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स, मार्नस लाबूशेन, इंग्लंडचा जोफ्रा आर्चर आणि दक्षिण आफ्रिकेचा साइमन हैमर यांना पहिले पाच क्रिकेट खेळाडू म्हणून निवडले. दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू हैमरने फक्त 5 कसोटी सामने खेळले आहेत.

इंग्लंडमध्ये खेळत पुरुष आणि महिला ऑस्ट्रेलियाने अ‍ॅशेस टिकवून ठेवण्यात कमिन्स, लाबूशेन आणि पेरी यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. आंद्रे रसेलला जगातील टी -20 आघाडीचा क्रिकेटर म्हणून निवडले गेले. 2019 मध्ये वेस्ट इंडीजच्या अष्टपैलू खेळाडूने 46 गडी बाद केले आणि टी-20 सामन्यात 1,080 धावा केल्या.

गेल्या तीन वर्षांपासून भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने जगातील आघाडीचा क्रिकेटपटू म्हणून पुरस्कार मिळवला होता, पण आता स्टोक्सने त्याला मागे टाकले आहे. 2016, 2017 आणि 2018 या वर्षी कोहलीला हा पुरस्कार देण्यात आला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्ध हेडिंगलेमध्ये स्टोक्सने महत्वाचा डाव खेळला आणि ऑस्ट्रेलियाच्या अगदी हातातोंडाशी आलेला विजयाचा घास अखेर तोंडून हिरावला गेला. स्टोक्सने क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात चांगली कामगिरी केली आहे, ज्यामुळे त्याला हा पुरस्कार देण्यात आला आहे.