Video: विल विल्यम्स याने वेलिंग्टनविरुद्ध सुपर स्मॅश सामन्यात हॅटट्रिक सोबत 9 चेंडूत घेतल्या 5 विकेट
विल विल्यम्स (Photo Credit: Twitter)

बुधवारी ऑस्ट्रेलियामध्ये खेळल्या जाणाऱ्या बिग बॅश लीगमध्ये (Big Bash League) अफगाणिस्तान प्रसिद्ध राशिद खान याने 3 चेंडूंत 3 खेळाडूंना पॅव्हेलियनमध्ये पाठवले, त्यानंतरच्या दुसर्‍याच सामन्यात पाकिस्तानचा गोलंदाज हरीस रऊफ याने हॅटट्रिक घेत आश्चर्यकारक कामगिरी केली. यासह गुरुवारी, 9 जानेवारीला न्यूझीलंडमध्ये खेळल्या जाणार्‍या सुपर स्मॅश (Super Smash) टी-20 लीगच्या एका सामन्यात गोलंदाजाने आपल्या नावावर हॅटट्रिक करून इतिहास रचला. एक काळ होता जेव्हा हॅटट्रिक घेणे ही एक मोठी गोष्ट मानली जात असे पण आता ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. कॅन्टरबरीचा मध्यम वेगवान गोलंदाज विल विल्यम्स (Will Williams) याने सुपर स्मॅश टी-20 लीगमध्ये वेलिंग्टन (Wellington) विरुद्ध सलग 3 बॉलमध्ये 3 गडी बाद केले. इतकेच नाही तर पुढच्या चेंडूंत या गोलंदाजाने दोन गडी बाद करून आपल्या संघाला 3 धावांनी रोमांचक विजय मिळवून दिला. (Video: राशिद खान याच्यानंतर पाकिस्तानच्या हारिस रऊफ यानेही बिग बॅश लीगमध्ये घेतली हॅटट्रिक)

149 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेलिंग्टनची टीम सहज विजय मिळवेल असे दिसत होते. 7 ओव्हरनंतर त्यांची धावसंख्या 4 बाद 126 धावा होती. जिंकण्यासाठी त्यांना 18 चेंडूत फक्त 23 धावांची गरज होती आणि त्याच्याकडे 6 विकेट बाकी होते. यानंतर विल्यम्स गोलंदाजीवर आला आणि त्याने कहरच केला. 18 व्या षटकातील चौथ्या बॉलवर विल्यम्सने कोल्सनला बोल्ड केले. पुढच्या बॉलवर जॉन्सला बोसकडे झेलबाद केले आणि खेरच्या चेंडूवर गिब्सनला बाद करत हॅटट्रिक पूर्ण केली. ओव्हरनंतर वेलिंग्टनची धावसंख्या 7 बाद 130 धावा अशी होती आणि आता त्यांना विजयासाठी 12 चेंडूंत 19 धावांची गरज होती. पाहा व्हिडिओ:

दरम्यान, विलियम्सच्या गोलंदाजीने प्रभावित होत कर्णधाराने त्याला अखेरची ओव्हरही दिली ज्यात त्याला 11 धावा वाचवायच्या होत्या. विल्यम्सने ठरल्यानुसार गोलंदाजी केली पण पहिल्या 4 चेंडूंत 8 धावा लुटवल्या, मात्र अखेरच्या दोन चेंडूवर वेलिंग्टनच्या दोन 2 फलंदाजांना माघारी धाडले आणि संघाचा 3 धावांनी विजय निश्चित केला. कॅन्टरबरी संघाच्या कॅप्टन कोलने नाणेफेक जिंकून या सामन्यात प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि निर्धारित 20 षटकांत 8 गडी गमावून 148 धावा केल्या होत्या.