Shikhar Dhawan च्या कारकिर्दीबद्दल मोठे अपडेट! BCCI च्या सूत्राने केला हा धक्कादायक खुलासा
Shikhar Dhawan (Photo Credit - Twitter)

Shikhar Dhawan: बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात द्विशतक झळकावल्यानंतर सलामीवीर म्हणून ईशान किशन एक मजबूत पर्याय म्हणून समोर आला असून भारतीय संघाच्या नव्या निवड समितीच्या स्थापनेनंतर अनुभवी सलामीवीर शिखर धवनच्या भवितव्याची चर्चा होणार आहे. धवनने त्याच्या शेवटच्या 9 एकदिवसीय सामन्यांपैकी 8 सामन्यांमध्ये वाईटरित्या संघर्ष केला आहे. दिल्लीचा हा डावखुरा फलंदाज पॉवरप्ले ओव्हर्समध्ये संथ फलंदाजी करतो, जो संघासाठी घातक ठरत आहे. टी-20 च्या जमान्यात शुबमन गिल आणि ईशान किशनच्या आक्रमक फलंदाजीसमोर शिखर धवन फिका पडताना दिसत आहे. बांगलादेशमध्ये एकदिवसीय मालिका गमावल्यानंतर बीसीसीआय संघाच्या कामगिरीची आढावा बैठक घेणार आहे. यामध्ये मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि एनसीए प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्याशी भविष्यातील खेळाडूवर चर्चा केली जाईल.

बीसीसीआयच्या सूत्राने केला धक्कादायक खुलासा

पीटीआयने बीसीसीआयच्या एका विश्वसनीय सूत्राच्या हवाल्याने सांगितले की, अनुभवी खेळाडूंना बाहेर काढण्याची प्रक्रिया पुढील वर्षापासून सुरू होईल. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ सूत्राने गोपनीयतेच्या अटीवर 'पीटीआय'ला सांगितले की, 'नवीन निवड समितीच्या स्थापनेनंतरच शिखरच्या भवितव्याबाबत निर्णय घेतला जाईल. मात्र या प्रकरणी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्या मताकडे दुर्लक्ष करता येणार नाही. (हे देखील वाचा: IND vs BAN 1st Test 2022: पहिल्या कसोटी मालिकेतुन रोहित शर्मा बाहेर, अभिमन्यू ईश्वरनला संघात स्थान, केएल राहुलकडे संघाचे नेतृत्व)

धवनची सर्वात मोठी समस्या

धवनची सर्वात मोठी अडचण ही आहे की त्याला डावाच्या सुरुवातीला वेगवान धावा करता येत नाहीत. 2019 विश्वचषकापूर्वी त्याचा स्ट्राइक रेट 100 पेक्षा जास्त होता, तर 2022 मध्ये त्याचा स्ट्राइक रेट 75 आहे. इशान किशनचे द्विशतक आणि महत्त्वाचे म्हणजे त्याने संघाला आवश्यक ती आक्रमक वृत्ती दिली. त्याच्या खेळीनंतर संघ व्यवस्थापनाला निवडीच्या बाबींचा विचार करण्यास भाग पाडले जाईल.