एम एस धोनी (Photo Credit : File Image)

भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) याच्या निवृत्तीच्या चर्चा जोर पकडू लागल्या आहे. आयसीसी (ICC) क्रिकेट विश्वचषकच्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंड (New Zealand) संघाकडून मिळालेल्या पराभवानंतर धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र, धोनीने स्वतः यावर कोणतेही भाष्य करणे टाळले आहे. यंदाच्या विश्वचषकमध्ये धोनीच्या संथ फलंदाजीमुळे चाहत्यांकडून त्याच्या निवृत्ती मागणी केली जात आहे. दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआय (BCCI) ने देखील धोनीच्या सेंड ऑफसाठी हालचाली सुरू केल्याचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे. (महेंद्र सिंह धोनी निवृत्तीनंतर करणार सैन्याद्वारे देशसेवा? धोनीच्या जवळच्या मित्राकडून खास खुलासा)

बीसीसीआयच्या सूत्रांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, विश्वचषकमध्ये धोनीने केलेल्या धिम्या फलंदाजीमुळे निवड समितीचे एम एस के प्रसाद (MSK Prasad) याविषयी लवकरच त्याच्याशी बोलणार आहेत. आणि जर धोनीने निवृत्ती घेतली नाही तर, त्याला आगामी मालिकेत संघात संधी मिळणार नाही, असे संकेत देखील बीसीसीआयच्या सुत्रांनी दिले. बीसीसीआयच्या सुत्रांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीत, "रिषभ पंत सारखे खेळाडू धोनीची जागा घेण्यासाठी सज्ज आहे. धोनी आता आक्रमक फलंदाज राहिलेला नाही. सहाव्या आणि सातव्या क्रमांकावरही त्याला संघर्ष करावा लगतो, त्यामुळे संघाचे नुकसान होत आहे," असे म्हटले.

दरम्यान, आगामी वेस्ट इंडिज (West Indies) दौऱ्यासाठी धोनीची निवड होण्याबाबत शक्यता कमीच आहे. तसेही 2020 टी-20 विश्वचषकसाठीच्या संघात देखील धोनीच्या नावाचा विचार केला जाणार नसल्याचे स्पष्ट संकेत निवड समितीने दिले असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे, धोनी येत्या काही दिवसात आपली निवृत्तीची घोषणा करण्याची शक्यता आहे.