Rahane Wins Heart Again: ऑस्ट्रेलियानंतर अजिंक्य रहाणेने जिंकली भारतीय चाहत्यांची मनं, सेलिब्रेशनसाठी आणलेला केक कापण्यास या कारणाने दिला नकार
अजिंक्य रहाणेने केक नकार दिला (Photo Credit: Twitter)

टीम इंडियाचा (Team India) दिग्गज फलंदाज अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) नेतृत्वात इतिहास रचणाऱ्या टीम इंडियाची क्रिकेट विश्वात बरीच प्रशंसा होत आहे. गुरुवारी भारतीय खेळाडू मुंबई विमानतळावर पोहोचला तेव्हा फुलांनी रहाणेचे स्वागत करण्यात करण्यात आले आणि घरी पोहचताच ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे चाहते आणि राहवाश्यांनी स्वागत केले. रहिवाश्यांनी कर्णधार रहाणेचं मुंबईतील (Mumbai) त्याच्या राहत्या घरी रेड कार्पेटवर फुलांचा वर्षाव करत वेलकम केलं. आनंदोत्सव साजरा करण्यासाठी केकही मागवण्यात आला होता, मात्र रहाणेने अशा आनंदाच्या क्षणी खिलाडूवृत्तीचं दर्शन घडवून देत केक कापण्यास नकार दिला. रहाणेने या जेस्चरने भारतीय चाहत्यांनी मनं जिंकली. झालं असं की क्रिकेट चाहत्यांनी रहाणेच्या स्वागतासाठी आणलेल्या केकवर ऑस्ट्रेलियाचा पराभव दर्शविण्यासाठी कांगारू बनविण्यात आला होता मात्र, रहाणेने विनम्रपणे तो कापण्यास नकार दिला आणि उपस्थितांमध्ये वाटण्यास सांगितले. (Ajinkya Rahane: 'अजिंक्य' रहाणे याचं मुंबईत आगमन; कुटुंबीय, चाहत्यांकडून ढोल ताशे वाजवत जल्लोषात स्वागत Watch Video)

कांगारु, हा ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी आहे आणि यामुळेच रहाणेने कांगारुच्या प्रतिकृतीचा केक कापाण्यास नकार दिला. विरोधी संघाच्याप्रती रहाणेचे हे औदार्य पाहून त्याचे खूप कौतुक होत आहे. रहाणेची ही खेळ भावना पाहता पुन्हा एकदा हे सिद्ध झाले आहे की क्रिकेटला 'जेंटलमॅन' गेम का म्हणतात. दरम्यान, रहाणेने विरोधी संघाबद्दल आदर व्यक्त करण्याची ही पहिली वेळ नाही. तत्पूर्वी, अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाने पहिल्यांदा भारत दौऱ्यावर कसोटी मालिका खेळली तेव्हा रहाणेनेही खेळाडूवृत्ती दाखवत पराभूत झालेल्या अफगाण खेळाडूंसह ट्रॉफी शेअर केली होती. रहाणेची ही खेळाची भावना पाहून त्याचे क्रिकेटविश्वात प्रचंड कौतुक करण्यात आले होते.

रहाणेने कसोटी क्रिकेटमध्ये पाच वेळा भारताचे नेतृत्व केले असून त्यापैकी चार कसोटी सामने जिंकले तर या वर्षाच्या सुरुवातीला सिडनी येथील सामना अनिर्णीत राहिला होता. शिवाय, रहाणेने भारताचे तीन वनडे सामन्यात नेतृत्व करत संघाला विजय मिळवून दिला आणि आपला100% विजयी टक्केवारी कायम ठेवली. त्याने कर्णधार म्हणून झिम्बाब्वेविरुद्ध 2015 मध्ये एकमेव टी-20 सामना गमावला आहे. दुसरीकडे, कांगारू संघास टीम इंडिया आता इंग्लंडच्या आव्हानसाठी सज्ज होत आहे. या दौऱ्याची सुरुवात कसोटी मालिकेपासून होणार असून पहिला सामना चेन्नई येथे 5 फेब्रुवारीपासून खेळला जाणार आहे.