Deepti Sharma (Photo Credits: Twitter)

India vs New Zealand women ODI 2019: पुरूषांप्रमाणेच महिलांचा  क्रिकेट संघ देखील न्युझिलंडमध्ये (New Zealand ) चमकदार कामगिरी करत आहे. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेमध्ये 2 सामने जिंकत महिला क्रिकेट संघाने आघाडी मिळवली आहे. मिताली राजच्या सेनेतील अवघ्या 21 वर्षीय दीप्ती शर्मा (Deepti Sharma) या खेळाडूने भारतीय क्रिकेट विश्वामध्ये एक नवा विक्रम रचला आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये (ODI)  तिने 1000 रन आणि 50 विकेट्स पूर्ण केल्या आहेत. हा टप्पा पूर्ण करताना तिने कपिल देव (Kapil Dev) यांचा विक्रम मोडीत काढला आहे.

भारताचे माजी क्रिकेटपटू कपिल देव यांना वनडे मध्ये 1000 रन आणि 50 विकेट्स पूर्ण करण्यासाठी 46 सामन्यांचा कालावधी लागला होता. मात्र दीप्तीने अवघ्या 43 व्या वनडे मध्ये हा टप्पा पूर्ण केला आहे. भारतीय क्रिकेट विश्वामध्ये अशी कामगिरी अवघ्या 14 खेळाडूंनी केली आहे. 1000 रन आणि 50 विकेट्स पूर्ण करण्यासाठी भारतीय स्त्री आणि पुरूष या दोन्हींचा विचार करता इतक्या जलद हा टप्पा पूर्ण करणारी खेळाडू ठरली आहे.

दीप्ती ही भारतीय महिला क्रिकेट संघातील ऑलराऊंडर खेळाडू आहे. 21 वर्षीय दीप्ती उत्तर प्रदेशातील आग्रा या शहरातील आहे. भारतीय क्रिकेट संघात उत्तम महिला स्पिनर म्हणून तिची ओळख आहे. पुरूषांप्रमाणेच महिलांच्या क्रिकेट संघालाही न्युझिलंडमध्ये समोरच्या संघाला क्लिन स्वीप करण्याचं लक्ष्य असणार आहे.