Shahid Afridi (Photo Credt- X)

IND vs PAK: आशिया कप २०२५ च्या सुपर-४ फेरीतील सामन्यात भारताने पाकिस्तानचा ६ गडी राखून पराभव केला. या पराभवानंतर पुन्हा एकदा पाकिस्तानी दिग्गजांनी रडगाणे सुरू केले आहे. भारताविरुद्धच्या पराभवानंतर त्यांनी अंपायरवरच फिक्सिंगचा आरोप केला आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने भारताला झुकते माप दिल्याचा आरोप करत ‘अंपायरला आयपीएलमध्येही काम करायचे आहे’, असे वादग्रस्त विधान केले आहे. PAK vs SL Super 4 Live Streaming: पाकिस्तान आणि श्रीलंकासाठी 'करो या मरो' ची लढत, जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार सामना?

'त्यांना IPL मध्येही अंपायरिंग करायचं आहे' - आफ्रिदी

एका टीव्ही शोमध्ये पाकिस्तानच्या पराभवावर बोलताना शाहिद आफ्रिदीने फखर जमानच्या विकेटवर आपले मत व्यक्त केले. भारताकडून लागोपाठ दुसऱ्यांदा झालेल्या पराभवामुळे आफ्रिदी संतापलेला दिसत होता. 'त्यांना आयपीएलमध्येही अंपायरिंग करायचे आहे', असा गंभीर आरोप करत त्याने अंपायरने आयपीएलमध्ये कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी भारताच्या बाजूने निर्णय दिल्याचा दावा केला.

आफ्रिदीच्या या विधानाला माजी पाकिस्तानी क्रिकेटर मोहम्मद युसूफनेही पाठिंबा दिला. युसूफ म्हणाला, "त्यांनी (अंपायरने) फार जास्त अँगल तपासले नाहीत. फखर जमानने तीन चौकार मारले होते आणि त्याने पहिल्याच षटकात बुमराहला चांगल्या प्रकारे हाताळले होते. त्यामुळे त्याची विकेट भारतासाठी खूप महत्त्वाची होती." यापूर्वी शोएब अख्तरनेही अशाच प्रकारचे विधान करून अंपायरवर आरोप केले होते, पण नंतर समोर आलेल्या पुराव्यांमधून संजू सॅमसनचा झेल योग्य असल्याचे स्पष्ट झाले होते.

भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार?

आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत दोन सामने झाले आहेत. दोन्ही सामन्यांमध्ये भारताने एकतर्फी विजय मिळवला आहे. ग्रुप स्टेजमध्ये भारताने पाकिस्तानला ७ गडी राखून हरवले, तर सुपर-४ मध्येही ६ गडी राखून विजय मिळवला. विशेष म्हणजे, या स्पर्धेत हे दोन्ही संघ पुन्हा एकदा एकमेकांसमोर येऊ शकतात. जर पाकिस्तानने आपले पुढील दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकले आणि भारतानेही आपल्या पुढील दोन सामन्यांपैकी एक जिंकला, तर अंतिम फेरीत त्यांच्यात पुन्हा एकदा रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो.