गौतम गंभीर (Photo Credits: Instagram/gautamgambhirfans)

क्रिकेटर गौतम गंभीर (Gautam Gambhir) ने नुकतीच क्रिकेट काराकीर्दीमधून निवृत्ती घेतली असली तरी, त्याच्यामागील विघ्ने काही हटत नसल्याचे दिसत आहे. काल (बुधवारी) दिल्लीच्या साकेत हायकोर्टाने गौतम गंभीरच्या अटकेचे आदेश दिले आहेत. एका रिअल इस्टेट प्रोजेक्टमध्ये लोकांची फसवणूक केल्याचा आरोप गंभीरवर लावण्यात आला आहे. तसेच फ्लॅटधारकांनी तक्रार केल्यानंतर, कोर्टाने कैकवेळा गंभीरला कोर्टात हजर होण्याचे आदेश दिले होते. मात्र प्रत्येकवेळी गौतमने न्यायालयाचे आदेश धुडकावून लावले, त्यामुळे आता न्यायालयाने त्याच्याविरुद्ध वॉरंट जारी केले आहे.

रुद्रा बिल्डवेल रिअॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड या रिअल इस्टेट कंपनीचा ब्रँड अॅम्बेसिडर आहे. या कंपनीचा गाझियाबादच्या इंदिरापूरम परिसरात एक इमारतीचा प्रकल्प उभा राहणार होता. त्यासाठी 17 लोकांनी 1.98 कोटी भरून फ्लॅट बुक केले. मात्र त्यांना हे फ्लॅट मिळू शकले नाहीत. हा प्रकल्प कधीच उभा राहिला नाही, मात्र यात गुंतवलेल पैसे या कंपनीचे व्यवस्थापक मुकेश खुराना आणि एचआर एफ्रासिटी प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष गौतम मेहता यांनी खाल्ले. ही गोष्ट समोर येताच, 2016 साली या दोघांवर फसवणूक, गैरव्यवहार आणि गुंतवणुकदारांचे पैसे लाटण्याचा आरोप ठेऊन तक्रार दाखल करण्यात आली.

गौतम या कंपनीचा सदिच्छादूत असल्यामुळे, त्याने या प्रकल्पाची मोठ्या प्रमाणावर जाहिरात आणि मार्केटिंग केले होते. न्यायालयाने याआधीही या प्रकरणाची सुनावणी केली होती. मात्र प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊनही गौतम कधीच कोर्टात हजर झाला नाही. म्हणून आता नायायालयाने त्याच्याविरुद्ध 10 हजार रुपयांचे जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. याबाबत कोर्टाची पुढची सुनावणी 24 जानेवारीला होणार आहे.