BCCI Office (PC - IANS)

जगभरात कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) (BCCI) मुंबईतील मुख्य कार्यालय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच उद्यापासून सर्व कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम'च्या (Work From Home) सुचना देण्यात आल्या आहेत.

कोरोना व्हायरसमुळे अनेक स्पर्धांच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. बीसीसीआयने 29 मार्चपासून सुरु होणारी आयपीएल स्पर्धा 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून भारत आणि दक्षिण आफ्रिका वन-डे मालिकाही रद्द केली आहे. यासंदर्भात पीटीआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे. बीसीसीआयच्या कर्मचाऱ्यांनी घरातून काम करण्याची तयारी दाखवल्यामुळे मंडळाने ऑफिस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. (हेही वाचा - रत्नागिरी: कोरोना व्हायरसची भीती दूर करण्यासाठी 'शिवभोजन थाळी'त मिळणार चिकन)

बीसीसीआयने आयपीएल व्यतिरिक्त स्थानिक क्रिकेट स्पर्धेलाही स्थगिती दिली होती. सध्या देशात महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. तसेच देशात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 100 हून अधिक झाली आहे. याशिवाय भारतात कोरोनामुळे 2 जणांचा बळी गेला आहे. राज्य सरकारकडून जनतेला गर्दीच्या ठिकाणी न जाण्याच्या सुचना दिल्या जात आहेत. तसेच आवश्यकता नसल्यास घरातून काम करण्याचा सल्लाही दिला जात आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याच्या सुचना दिल्या आहेत.