चिकन (Chicken) खाल्याने कोरोनाचा (Coronavirus) धोका असल्याची अफवा पसरवल्यामुळे ग्रामीण भागातील पोल्ट्री व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. परिणामी पोल्ट्री फार्म चालवणाऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभं ठाकलं आहे. चिकन खाल्ल्याने कोरोना व्हायरसची लागण होते, असं गैरसमज लोकांमध्ये पसरला आहे. हा गैरसमज दुर करण्यासाठी रत्नागिरीमध्ये (Ratnagiri) 'शिवभोजन थाळी'त चिकन मिळणार आहे. यासंदर्भात झी न्यूजने वृत्त प्रकाशित केलं आहे.
यासाठी ग्राहकाला केवळ 10 रुपये मोजावे लागणार आहेत. चिकन खाल्ल्याने कोरोना होत नाही, हे सांगण्यासाठी रत्नागिरीमध्ये ही शक्कल लढवण्यात आली आहे. रत्नागिरीतील एसटी स्टॅण्ड जवळच्या शिवभोजन केंद्रावरील 'शिवभोजन थाळी'त ग्राहकांना केवळ 10 रुपयांमध्ये चिकनचा आस्वाद घेता येणार आहे. ही थाळी सर्वसामान्यांना परवडणारी आहे. यामुळे चिकन खाण्यासंदर्भातील सर्व अफवा दूर होण्यास मदत होणार आहे. (हेही वाचा - Coronavirus: आता कोरोनाग्रस्त रुग्णांच्या हातावर मारला जाणार निळ्या शाईचा शिक्का; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती)
सध्या राज्यात चिकन खाल्ल्याने कोरोनाची लागण होते, अशी अफवा पसरवली जात आहे. या अफवेमुळे चिकन व्यवसायाला उतरती कळा लागली आहे. चिकन व्यवसायिक आणि पोल्ट्री फार्म धारकांवर मोठं संकट उभं ठाकलं आहे. त्यामुळे रत्नागिरीमध्ये हा अनोखा उपक्रम राबवण्यात येणार आहे. रत्नागिरीमध्ये बुधवारी, शुक्रवारी आणि रविवारी शिवभोजन थाळीत शाहकारी सोबत चिकनही दिलं जाणार आहे.
चिकन संदर्भातील अफवांमुळे चिकनचे दर 200 रुपयांवरुन 50-70 रुपये प्रति किलोपर्यंत घसरले आहेत. तसेच 5 ते 6 रुपयांना मिळणारी अंडी 2 ते 3 रुपयांना मिळत आहेत. या अफवेमुळे मागील आठवड्यामध्ये पालघर आणि कोल्हापुरातील पोल्ट्री फार्म धारकांनी कोंबडिची पिल्लं आणि अंडी नष्ट केली होती. महाराष्ट्रात आतापर्यंत 39 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे सर्वत्र भीतीमय वातावरण निर्माण झाले आहे.