
असे म्हणतात की, ‘देणारा जेव्हा देतो तेव्हा तो छप्पर फाड देतो’. काहीसा असाच प्रकार साऊथ कॅरोलिना येथील एका व्यक्तीबाबत घडला आहे. ही व्यक्ती किराणा दुकानात काही वस्तू विकत घेण्यासाठी गेली होती आणि तिथून तो कोट्याधीश बनून परतला. आपल्या पत्नीच्या सांगण्यावरून तो काही किराणा समान घेण्यासाठी दुकानात गेला होता, परंतु दुकानात त्याने विकत घेतलेल्या लॉटरीच्या तिकिटामुळे (Lottery Ticket) त्याला दीड कोटी रुपयांचा जॅकपॉट लागला.
दक्षिण कॅरोलिनाचा 46 कॅर्षीय प्रेस्टन माकी, नेहमीप्रमाणे आपल्या कामावर गेला होता. यादरम्यान त्याच्या पत्नीने त्याला काही किराणा सामान घेऊन येण्यास सांगितले. सुरुवातीला त्याने नकार दिला, पण नंतर कामावरून परतत असताना तो स्टोअरमध्ये थांबला. तेथे त्याने सामानासह पाच फॅन्टसी (लॉटरी) तिकिटे खरेदी केली आणि तो आपल्या घरी गेला. दुसऱ्या दिवशी लकी ड्रॉमध्ये त्याचे नाव आल्यावर त्याने एक-दोन रुपये नव्हे तर तब्बल 190,736 डॉलर म्हणजेच 1.5 कोटी रुपयांची लॉटरी जिंकली.
प्रेस्टनने सांगितले की, किराणा दुकानातून वस्तू खरेदी करून घरी गेल्यावर तो लॉटरीच्या तिकीटाबाबत विसरून गेला होता. मात्र सकाळी किचनमध्ये काही काम करत असताना, आदल्या रात्री काढलेली लॉटरी तपासावी असे त्याच्या मनात आले. जेव्हा त्याने मोबाईलवरून तिकीट स्कॅन केले तेव्हा त्याला दिसले की, त्याला जॅकपॉट लागला आहे व तो कोट्याधीश झाला आहे. अनपेक्षितपणे मिळालेला हा सुखद धक्का प्रेस्टनच्या आणि त्याच्या कुटुंबासाठी आनंदाचा क्षण ठरला आहे. (हेही वाचा: शिंदे गटाला शिवसेनेचे नाव आणि चिन्ह मिळावे का? ABP C-Voter Survey मध्ये जनतेने दिल्या धक्कादायक प्रतिक्रिया)
या लॉटरीचे श्रेय तो आपल्या पत्नीला देतो, कारण तिने त्याला सामान खरेदी करण्यासाठी पाठवले नसते तर तो ही लॉटरी जिंकू शकला नसता. तो म्हणतो, सुरुवातीला मी सामान घेऊन येण्यास नकार दिला होता, मात्र जेव्हा माझ्या पत्नीने माझ्यावर दबाव टाकला तेव्हा मी जवळच्या किराणा दुकानात गेलो आणि तिकिटे खरेदी केली. लॉटरीत जिंकलेले पैसे आपण चांगल्या ठिकाणी गुंतवणार असल्याचे त्याने सांगितले.