Fact Check: मालाड पूर्व मधील ओमकार अल्टा माँटे येथे 169 जणांना कोरोना विषाणूची लागण? जाणून घ्या व्हायरल फोटोमागील सत्य
Viral Image from Omkar Alta Monte Malad East (PC- Twitter)

Fact Check: गेल्या अनेक दिवसांपासून समाज माध्यमांमधून मालाड पूर्व मधील ओमकार अल्टा माँटे (Omkar Alta Monte, Malad East) येथे 169 कोरोना बाधित रुग्ण असल्याची माहिती छायाचित्रांसह पसरवली जात आहे. या बातमीमुळे मालाड पूर्व (Malada East) भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच या भागात राहणाऱ्या नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या फोटोमध्ये मालाड पूर्व मधील ओमकार अल्टा माँटे ही सोसायटी दिसत आहे. या सोसायटीसमोर मुंबई महानगरपालिकेची एसी बस आणि पीपीई किट घातलेले 15 ते 20 वैद्यकिय कर्मचारी दिसून येत आहेत. (हेही वाचा -Fact Check: आयुष मंत्रालयाच्या वैज्ञानिक पॅनलचा कोविड-19 वरील आयुर्वेदिक औषध स्वीकारण्यास नकार? PIB ने सांगितले व्हायरल पोस्टमागील सत्य)

परंतु, मुंबई महानगरपालिकेने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून या व्हायरल फोटोचा खुलासा केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा फोटो चुकीचा असून हे छायाचित्र तेथे आयोजित तपासणी शिबीर (स्क्रिनिंग कॅम्प) चे आहे. त्यामुळे संबंधित नागरिकांनी कृपया घाबरून जाऊ नये, असं आवाहन BMC ने केलं आहे.

सध्या राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. दरम्यान, सोशल मीडियावर कोरोना संदर्भातील अनेक व्हिडिओज तसेच फोटोज व्हायरल होत आहेत. मात्र, यातील अनेक व्हिडिओ, फोटोज खोटे आहेत. महापालिका प्रशासनाकडून या फोटोज आणि व्हिडिओजची पडताळणी होत असते. नागरिकांनी चुकीचे मॅसेज, व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर फॉरवर्ड करू नये, असा सूचना वारंवार महापालिकेकडून देण्यात येत आहेत.