भारतामध्ये प्लास्टिक कचरा (Plastic Waste) दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे भूपृष्ठावरील प्राण्यांचे जीवन अडचणीत येत आहे. तामिळनाडूमधील (Tamil Nadu ) पशुवैद्यकीय आणि प्राणी विज्ञान विद्यापीठातील डॉक्टरांनी एका गाईवर शस्त्रक्रिया (Surgery) केली. या शस्त्रक्रियेत गाईच्या पोटातून चक्क 52 किलो प्लास्टिक बाहेर काढण्यात आले आहे. तिरुमुलेवॉयल (Thirumullaivoyal) या गावात सुमारे 5 तास ही शस्त्रक्रिया चालली, अशी माहिती ‘द हिंदू’ या इंग्रजी वृत्तपत्राने दिली आहे. मागील काही दिवसांपासून ही गाय आपला पाय पोटात मारत होती. त्यानंतर तिच्या दुधात घट झाली. ही बाब गायीचे मालक पी. मुनीरत्नम यांच्या लक्षात आली. मुनीरत्नम यांनी या गायीला पशुवैद्यकीय आणि प्राणी विज्ञान विद्यापीठात दाखल केले. त्यानंतर तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेदरम्यान, या गायीच्या पोटातून तब्बल 52 किलो कचरा काढण्यात आला आहे.
हेही वाचा - अंतराळातील कचरा ठरतोय नवीन डोकेदुखी
प्लास्टिक कचऱ्याची योग्य विल्हेवाट न केल्याने गायीची शस्त्रक्रिया करण्यात आली. याआधीदेखील गायीच्या पोटातून अशा प्रकारे प्लास्टिक कचरा काढण्यात आला आहे. परंतु, एवढ्यामोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच कचरा सापडला असल्याचे विद्यापीठाचे संचालक एस. बालसुब्रमण्यम यांनी सांगितले.
मुनीरत्नम यांनी ही गाय 6 महिन्यांपूर्वी वेल्लोर येथून विकत आणली होती. या गायीने 20 दिवसांपूर्वीच एका वासराला जन्म दिला होता. परंतु, ती अत्यंत कमी दूध देत होती. पोटातील प्लास्टिकमुळे या गायीला त्रास होत असल्याचे मुनीरत्नम यांच्या लक्षात आले होते. त्यांनी पशुवैद्यकीय डॉक्टरांकडून गायीच्या तपासण्या करून घेतल्या. या तपासणीमध्ये गायीच्या पोटातील 75 टक्के प्लास्टिक असल्याचे निदर्शनात आले.
या शस्त्रक्रियेसाठी मुनीरत्नम यांना 70 रुपये खर्च आला. सरकारी रुग्णालयामुळे हा खर्च अगदीच कमी होता. मात्र, हीच शस्त्रक्रिया खासगी रुग्णालयात केली असती तर, मुनीरत्नम यांना सुमारे 35 हजार खर्च आला असता, असंही बालसुब्रमण्यम यांनी सांगितलं. सध्या शहरांमध्ये सार्वजनिक ठिकाणी प्लास्टिकच्या कचऱ्याचे ठिग पडलेले असतात. या कचऱ्यात प्लास्टिकमध्ये अन्नपदार्थ असतात. हे अन्नपदार्थ खाताना या गायी प्लास्टिक कचराही खातात. त्यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. या प्लास्टिक कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे गरजेचे आहे.