अंतराळातील कचरा ठरतोय नवीन डोकेदुखी

विविध प्रकारचा कचरा आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या यामुळे जगातील प्रत्येक देश त्रासलेला आहे. साठलेल्या कचऱ्याचे नियोजन आणि विल्हेवाट करण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत, जनजागृतीद्वारे कचऱ्याचे व्यवस्थापन केले जात आहे. मात्र सध्या कचऱ्याच्या अजून एका प्रकाराने प्रत्येक देशाची आणि शास्त्रज्ञांची झोप उडवली आहे. हा प्रकार म्हणजे ‘अवकाशातील कचरा’. अर्थात अवकाशातील कचरा पृथ्वीबाहेरील वातावरणात, पृथ्वीच्या आजूबाजूला तयार होत असल्याने सर्वसामान्यांना याचा थेट फटका अजून तरी बसलेला नाही. मात्र नवनवीन अवकाश उपक्रम हाती घेतलेल्या देशांसाठी ही फार मोठी डोकेदुखी होऊन बसलेली आहे.

गेल्या साठ वर्षांतील १५ हजार अवकाशयानांचे भाग, निकामी याने, अग्निबाणांचे अवशेष, बॅटऱ्या या स्वरूपाचा कचरा अवकाशात वाढत आहे. आजपर्यंत जवळजवळ ८ ते १० हजार टन इतका कचरा अवकाशात साठलेला आहे. अंतराळात सोडण्यात आलेल्या प्रत्येक उपग्रहाचा कालावधी ठरलेला असतो. तो संपला की त्याचे काम संपते, त्याचा उपयोग संपतो. पण तो उपग्रह खाली न पडता अवकाशात फिरत राहतो. एकामागे एक असे अनेक उपग्रह सोडले जातात आणि कालांतराने ते निरुपयोगी होऊन फिरत राहतात. आणि साठत राहतो अवकाशातील कचरा.

१९५७ साली रशियाने स्पुटनिक हा पहिला उपग्रह अवकाशात सोडला तेव्हापासून अवकाशात कचरा निर्माण होण्यास सुरुवात झाली होती. अमेरिकेच्या नासा या अवकाश संशोधन संस्थेने दिलेल्या माहितीनुसार अवकाश कचऱ्याचे वीस हजार तुकडे असून त्यात अग्निबाणांचे सुटे भाग, निकामी उपग्रह व इतर वस्तूंचा समावेश आहे. गोटीएवढय़ा आकाराचा कचराही नासाने शोधला असून अशा प्रकारच्या पाच लाख वस्तू पृथ्वीभोवती फिरत आहेत, आणि त्यापेक्षा कमी आकाराच्या कचऱ्याच्या रूपातील कोटय़वधी निरुपयोगी वस्तू अवकाशात फिरत आहेत. अनेकदा यानाने एक ठराविक उंची प्राप्त केल्यावर अथवा एखादा महत्वाचा टप्पा पार करतांना किंवा सुरू होतांना दुर्घटना होते आणि रॉकेटचा स्फोट होतो त्यामुळेही अंतराळ कच-यात वाढ होते. तर काही मानवी मोहिमांत काही उपकरणे स्पेस वॉक  करतांना नियंत्रणातून सुटून ती अवकाशात गेल्याच्याही घटना आहेत. उदा. प्रसिद्ध अंतराळवीर सुनिता विल्यम्सच्या हातून स्पेस वॉक करतांना कॅमेरा निसटला होता आणि तो आता पृथ्वीच्या कक्षेभोवती फिरत आहे.

सोडल्या जाणार्‍या नव्या उपग्रहांना यातले काही निरुपयोगी उपग्रह अथवा कचऱ्यामधील काही घटक धडकण्याची शक्यता असते. अशीच एक अशक्यप्राय घटना १० फेब्रुवारी २००९ साली घडली. अमरिकेचा वापरात असलेला इरिडियम-३३ हा दळणवळण उपग्रह आणि रशियचा कार्यकाल संपलेला कॉसमॉस-२२५१ यांची ७८९ किलोमीटर उंचीवर टक्कर होऊन, १७४० पेक्षा जास्त तुकड्यांचा कचरा अवकाशात पसरला. वापरात नसलेल्या रशियाच्या उपग्रहाची कक्षा बदलली गेल्याने हा अपघात झाला. या कच-यामुळे इतर उपग्रहांना, अवकाश मोहिमांना धोका निर्माण झाल्याची भिती व्यक्त होत आहे.

फार कमी देश अंतराळ मोहिमेत सहभागी होत असतात. यामध्ये रशिया, अमेरिका, फ्रान्स, जपान, चीन, इंग्लंड, भारत, युक्रेन आणि इराण यांचा समावेश आहे. असे असले तरी अवकाश कचरा होऊ नये यासाठी सर्वसामावेशक असा कायदा अजून अस्तित्वातच आलेला नाही. या कचऱ्याची लवकर विल्वेवाट लावली नाही, तर गंभीर घटना होऊ शकते, हे अवकाश संशोधन संस्थांनाही माहिती आहे. मात्र या कचऱ्याची विल्हेवाट लावणे प्रचंड खर्चीक आहे. त्यामुळे या कचऱ्याची जबाबदारी घेण्यास कोणताही देश फारसा उत्सुक नाही. अमेरिका आणि युरोपमधील काही राष्ट्रे काही विशेष रचना करून उपग्रह अवकाशात पाठवतात. अशा उपग्रहांमध्ये  जास्त इंधन असते. त्यामुळे जेव्हा उपग्रहाचा कार्यकाल संपतो तेव्हा त्या उपग्रहावरील इंजिनाने उपग्रहाची दिशा बदलली जाते आणि तो पृथ्वीच्या दिशेने येत वातावरणात जळून नष्ट होतो. मात्र हे तंत्रज्ञान फारच खर्चिक असल्याने इतर देश अजूनही यापासून लांबच आहेत.

अमेरिकेने रडार व दुर्बिणीच्या सहाय्याने कचऱ्यावर लक्ष ठेवणे सुरू केले आहे. हे कण त्यांच्या कक्षेमधून खाली ढकलणे अथवा त्यांचा वेग कमी करणे यावर विचार चालू आहे.

अंतराळातील कचरा कमी करून अंतराळवीरांसाठी ते सुरक्षित करावे, यासाठी आंतरराष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून जपानने एक जाळे अवकाशात सोडले आहे. याच्या सहाय्याने जर का जपानला कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावता आली तर शास्त्रज्ञांना अवकाश प्रदूषणावर मात करणे सोपे होईल.

येत्या काही वर्षांत विमान उड्डाणांप्रमाणे यानांचे उड्डाण होईल, आणि म्हणूनच अंतराळातील हा कचरा वाढण्याची आणि त्यापासून निर्माण होणाऱ्या धोक्याची पातळी अजून वाढणार आहे. तरी वेळीच यावर काही उपाययोजना राबवली गेली नही तर भविष्यात अंतराळयोजनांना फार मोठा धोका निर्माण होऊ शकतो यात शंका नाही.