Fact Check: किसान विकास मित्र समिती कृषी मंत्रालयाच्या वेबसाईटद्वारे देत आहे नोकरीची संधी? PIB ने सांगितले सत्य
Kisan Vikas Mitra Samiti (KVMS) (Photo Credits: PIB)

सोशल मीडिया माध्यमांमध्ये सध्या एक पोस्ट फिरत आहे. यात किसान विकास मित्र समिती (Kisan Vikas Mitra Samiti) कृषी क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना नोकरी देण्यात येणार आहे असा दावा करण्यात आला आहे. नोकरीची ही संधी कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाकडून (Ministry of Agriculture) देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. तसंच यासाठी इच्छुक असणाऱ्यांनी kvms.org.in करावे, असेही पोस्टमध्ये सांगण्यात आले आहे. कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय ही भारतातील शेतीशी संबंधित नियम, कायदे आणि नियमांची आखणी व कारभार करणारी सर्वोच्च संस्था आहे.

व्हायरल होणाऱ्या या पोस्टमागील सत्य पीआयबी फॅक्ट चेकने (PIB Fact Check) तपासले असून हा दावा खोटा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाची अशी कोणतीही वेबसाईट नसल्याचेही त्यांनी सांगितले. पीआयबीने आपल्या ट्विटमध्ये लिहिले, "हा दावा खोटा आहे. कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाअंतर्गत अशी कोणतीही वेबसाईट नाही." (Fact Check: प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेअंतर्गत निर्माण केलेली सर्वोत्तम आरोग्य संस्था असल्याचा 'स्वास्थ्य एवं जन कल्याण संस्थान'चा दावा; PIB ने केला खुलासा)

Fact Check By PIB:

कोरोना व्हायरस संकटकाळात फेक न्यूजला उधाण आले. खोट्या बातम्यांमुळे नागरिकांचा गोंधळ उडतो आणि अनेकदा फसवणूकही होते. त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या अशा प्रकारच्या बातम्यांना बळी पडू नये असे आवाहन सरकारकडून वारंवार करण्यात येते. तसंच पीआयबी फॅक्ट चेककडून व्हायरल मेसेजमागील सत्य स्पष्ट करण्यात येते. त्यामुळे फेक न्यूज रोखण्यासाठी डिजिटल माध्यमात त्या फॉरवर्ड करणे टाळणे गरजेचे आहे.