Representational Image (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरसची (Coronavirus) दुसरी लाट ज्या वेगाने देशभर पसरत आहे, त्यापेक्षा जास्त वेगाने अफवा आणि खोटी माहिती (Fake News) सोशल मीडियावर पसरली जात आहे. कधी कोरोना विषाणूच्या घरगुती उपचारांशी संबंधित काही चुकीची माहिती असते, तर काही वेळा घरीच ऑक्सिजनची पातळी कशी वाढवावी हे सांगितले जाते. सध्या कोरोना लसीबाबत सोशल मीडियावर अनेक खोट्या पोस्ट व्हायरल होत आहेत, ज्याबाबत पीआयबी फॅक्ट चेकने (PIB Fact Check) लोकांना माहिती दिली आहे. लसींच्या अफवांपासून सावध रहा असा सल्ला पीआयबीने दिला आहे.

पीआयबी फॅक्ट चेकच्या टीमने ट्वीट करत, कोरोना विषाणू लसीसंदर्भात सोशल मिडियावर केलेले दावे खोडून काढले आहेत. यामधील पहिला दावा आहे की, एक किंवा अधिक गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीने लस घेऊ नये. पीआयबी फॅक्ट चेकने सांगितले आहे की, अशाच लोकांना संसर्गाचा धोका अधिक असतो त्यामुळे अशा लोकांनी लस घ्यायला हवी.

पुढील भ्रम अथवा अफवा आहे की, लसीकरण झाल्यावर मास्क घालण्याची गरज नाही. मात्र ही गोष्ट चुकीची असून, लसीकरण झाल्यावरही मास्क घालणे, हात धुणे व सामाजिक अंतराचे पालन करणे गरजेचे असल्याचे पीआयबी फॅक्ट चेकने सांगितले आहे. पुढील दावा आहे की, तुम्हाला कोरोनाचा संसर्ग झाला असल्यास लस घेण्याची गरज नाही. ही गोष्टही चुकीची असून कोरोनापासून बरे झाल्यावर 3 महिन्यांनी आपण लस घ्याची असा सल्ला पीआयबी फॅक्ट चेकने दिला आहे.

पुढील अफवा आहे की, लसीमुळे महिला आणि पुरुषांमध्ये वंध्यत्व (Infertility) येऊ शकते. त्यावर पीआयबीने सांगितले आहे की, ‘ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे आणि त्यामुळे वंध्यत्व येऊ शकेल असा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही.’ अजून  एका पोस्टमध्ये दावा केला होता की, मासिक पाळीच्या पाच दिवस आधी आणि पाच दिवस नंतर मुलींना लस घेऊ नये. पीआयबी फॅक्ट चेकने हा दावादेखील खोटा असल्याचे सांगितले आहे. (हेही वाचा: Fact Check: वेलची, दालचिनी, मिरपूड, लवंगा, ओवा, हळदीच्या काढ्याने 24 तासांत बरा होईल Covid-19 चा संसर्ग? जाणून घ्या व्हायरल ऑडीओ क्लिपमागील सत्य)

स्तनपान करणाऱ्या मातांनीही कोरोनाची लस घेऊ नये अशी एक अफवा पसरली होती. यावर अफवांवर विश्वास ठेऊ नका, स्तनपान करणाऱ्या मातांनी लवकरात लवकर लस घ्या असे सरकारने सांगितले आहे.