लग्नानंतर काही मिनिटांमध्ये मंडपातच घटस्फोट; कारण वाचून बुचकाळ्यात पडाल
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit: Wikimedia Commons)

अहमदाबाद: सध्या पती पत्नी यांच्या नात्यातील संयम, सहनशीलता कमी होत आहे याबाबतच्या गोष्टी आपण पाहतो, ऐकतो. मात्र ही सहनशीलता इतकी कमी झाली आहे की अहमदाबाद येथे एका जोडप्याने लग्न केल्यावर चक्क काही मिनिटांमध्ये घटस्फोट घेतला आहे. यासाठीचे कारण ऐकून तुम्ही बुचकळ्यात पडाल, तर जेवणासारख्या क्षुल्लक बाबीवरून हा घटस्फोट घडला आहे. दोन्ही पक्षांमध्ये जेवणावरून सुरु झालेले भांडणे इतके वाढले की, ज्या मंडपामध्ये एकमेकांच्या गळ्यात हार घातले त्याच मंडपात घटस्फोट घेतला गेला.

अहमदाबाद येथे अतिशय व्यवस्थितरित्या हे लग्न पार पडले. एकमेकांसोबत सात जन्म राहण्याची वचने घेतली गेली. त्यानंतर दोन्ही पक्ष जेवायला बसले. त्यावेळी एका छोट्या कारणावरून कुरबुर सुरु झाली, थोड्याच वेळात त्याची एका भांडणात परिणती झाली. शेवटी नवरा नवरीही एकमेकांसोबत भांडायला उठले. एकमेकांवर भांडी फेकण्यापर्यंत हे भांडण पुढे गेले. पोलिसांना बोलावून हे भांडण मिटवण्यात आले. (हेही वाचा : बायको अंघोळ करत नाही, घुसमटलेल्या नवऱ्याचा घटस्फोटासाठी अर्ज, महिला आयोगाने घेतली दखल)

या दरम्यान नवरा नवरीने एकमेकांसोबत न राहण्याचा निर्णय घेतला. लगेच दोन्ही पक्षांनी आपापल्या वकिलांना बोलावले आणि लग्न मंडपातच घटस्फोटही घेतला गेला. एकमेकांना दिलेले सर्व गिफ्ट परत करून उभयपक्ष आपापल्या घरी परतले. दरम्यान नुकतेच पत्नी घरी 10 मिनिटे उशिरा पोहचली म्हणून पतीने घटस्फोट दिल्याची घटना उत्तर प्रदेश येथे घडली आहे. अशा घटना पाहता, सध्या नाते सुरु करण्याची आणि ते सांभाळण्याची क्षमता आणि सहनशीलता किती कमी झाली आहे याचा प्रत्यय येतो.