अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यामधील पारनेर तालुक्यातील (Parner Taluka) वडझिरे (Vadjire) येथे सोमवारी रात्री एका महिलेची दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळी घालून हत्या (Murder) केली. सविता सुनील गायकवाड (वय, 35 वर्ष), असं या महिलेचं नाव आहे. वैयक्तिक वादातून ही हत्या करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. पारनेर तालुक्यातील पारनेर-अळकुटी मार्गावर वडझिरे गावात सोमवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे पारनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, सविता गायकवाड यांचे दोन तरुणांसोबत वाद झाले होते. त्यामुळे यातील एका तरुणाने आपल्याकडील गावठी पिस्तुलने सविता यांच्यावर एका पाठोपाठ 3 गोळ्या झाडल्या. या गोळीबारामुळे सविता रक्ताच्या थारोळ्यात खाली पडल्या. आरोपींनी सविता यांच्यावर गोळीबार करून घटनास्थळावरून पळ काढला. हा सर्व प्रकार पाहिल्यानंतर गावकऱ्यांनी पीडित महिलेला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र, सविता यांचा रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच मृत्यू झाला. (हेही वाचा - पाकिस्तान पुन्हा भारतावर दहशतवादी हल्ला करण्याचा तयारीत; भारतीय सुरक्षा आणि तपास यंत्रणेचा खुलासा; 18 फेब्रुवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE)
या संपूर्ण प्रकारानंतर वडझिरे गावात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली असून पीडित महिलेच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी सविता यांच्या मुलीने एका तरुणाविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यामुळे याच तरुणाने सविता यांच्यावर गोळीबार केला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.