Jagdish Mulik | Twitter

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अजातशत्रू व्यक्तिमत्त्वांपैकी एक गिरीश बापट (Girish Bapat) यांचं काही दिवसांपूर्वी दीर्घ आजारात निधन झालं आहे. गिरीश बापट यांच्या निधनाने पुण्यात भाजपाने मोठा आधार गमावला आहे. पण त्यांच्या निधनाला काही तास उलटत नाही तो आता उत्साही भाजपा कार्यकर्त्यांनी जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांच्या वाढदिवसानिमित्त आज ( 1 एप्रिल) पोस्टर्स लावताना त्यावर त्यांचा उल्लेख 'भावी खासदार' असा केला आहे. अलिकडेच कॉंग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांनी पुणे लोकसभा पोटनिवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर आता भाजपा समर्थक, नेत्यांनीही पोटनिवडणूकीत उमेदारीचे दावे सांगण्यात सुरूवात केली आहे.

जगदीश मुळीक यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या बॅनरबाजीवरून आता एनसीपी नेते जितेंद्र आव्हाड यांनी टीपण्णी केली आहे. ट्वीटा करत त्यांनी '१० दिवसांचे सुतक तर संपुद्या मग लावा बैनर का तुम्ही वाटच बघत होतात … आणि म्हणता आम्ही इतर पक्षापेक्षा वेगळे आहोत .. हाच का तुमचा वेगळे पणा .. बापट साहेबांच्या घरच्यांचे अश्रू अजुन वाहात आहेत .. तोवरच तुम्ही बैट पॅड घालून तयार' असं सुनावलं आहे.

अतिक शेख या मुळीक समर्थकाने कल्याणीनगर भागात जगदीश मुळीक यांच्या वाढदिवसानिमित्त ही पोस्टरबाजी केली आहे. गिरीश बापटांचा मागील 40 वर्ष पुण्याच्या राजकारणात दबदबा आहे. अशात ही पोस्टरबाजी कार्यकर्त्यांच्या असंवेदनशीलता कळस मानला जात आहे.

जगदीश मुळीक यांनी मात्र वाढदिवसानिमित्त घेण्यात येणारे सर्व कार्यक्रम, उपक्रम रद्द करण्यात आले असल्याचं स्पष्ट केले आहे.