Covid-19 Vaccine: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची लस का घेतील नाही? महत्वाची माहिती आली समोर
Chief Minister Uddhav Thackeray (PC - Twitter)

भारतात सोमवारपासून (1 मार्च) कोरोना लसीकरणाच्या (COVID-19 Vaccine) तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. त्याअंतर्गत 60 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येत आहे. दरम्यान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, विविध राज्यांतील अनेक मुख्यमंत्र्यांनी कोरोनाची लस घेतली आहे. तसेच इतर लोकांनाही लवकरात लवकर कोरोनाची लस घ्यावी, असेही त्यांनी आवाहन केले आहे. मात्र, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी कोरोनाची लस घेण्याचे टाळले आहे. त्यानंतर सर्वत्र एकच चर्चा रंगली होती. परंतु, मुख्यमंत्री कोरोना लस का घेतली नाही? याचे कारण आता समोर आले आहे.

उद्धव ठाकरे यांच्यावर हृदय शस्त्रक्रिया झाली आहे. यामुळे विधिमंडळाचे अधिवेशन संपल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच उद्धव ठाकरे लस घेणार आहेत, अशी माहिती समोर आली आहे. यासंदर्भात न्युज 18 लोकमतने वृत्त दिले आहे. कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही कोरोनाची लस घेतल्याची माहिती दिली आहे. याशिवाय, महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी कोरोनाची लस घेतली आहे. हे देखील वाचा- Maharashtra Budget Session 2021: महिलांसंदर्भातील आरोप करताना सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी संयम ठेवायला पाहिजे - अजित पवार

महाराष्ट्रात वाढणारी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या चिंताजनक आहे. राज्यात काल (3 मार्च) 9 हजार 855 कोरोनाबाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. तर, 6 हजार 559 कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात एकूण 20 लाख 43 हजार 349 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 82 हजार 343 रुग्ण सक्रिय आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.77% झाले आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.