आनंद दिघे यांना कोणी मारलं? सोनू निगमच्या हत्येचा कट कोणी रचला? निलेश राणे यांच्याकडून बाळासाहेब ठाकरे यांच्यावर खळबळजनक आरोप
Balasaheb Thackeray & Sonu Nigam | (Image courtesy: Archived, edited, representative)

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्यावर सनसनाटी आरोप केल्याने एकच खळबळ उडाली आहे. आनंद दिघे यांच्या मृत्यूस बाळासाहेब ठाकरे यांना जबाबदार धरत याच प्रकरणात दोन शिवसैनिकांच्याही हत्या झाल्याचे खा. राणे यांनी म्हटले आहे. तर, गायक सोनू निगम (Sonu Nigam) आणि ठाकरे घराण्याचे नातं काय होतं? त्याच्या हत्येचा कट रचण्यात आला होता, असे खळबळजनक वक्तव्य निलेश राणे (Nilesh Rane) यांनी केले आहे. निलेश राणे हे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पूत्र आहेत.

एका मुलाखतीत निलेश राणे यांनी हे वक्तव्य केले आहे. बाळासाहेबांना सोनू निगम यांना ठार मारायचं होतं. त्यासाठी अनेकदा प्रयत्नही झाले. याबाबत तुम्ही सोनू निगमलाही विचारु शकता. तो घाबरला असेल. पण, आज बाळासाहेब हायात नाहीत. तर, कदाचित ते खरं सांगू शकतील. शिवसेना नेते विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर एका सभेत गंभीर आरोप केले होते. या आरोपांवरुन बोलताना राणे यांनी हे वक्तव्य केले. दरम्यान, बाळासाहेब आमच्यावर बोलत होते. आम्हाला ते चालत होतं. पण, इतर कुणीही बोललेलं आम्हाला खपणार नाही? आम्हाला राणे म्हणतात. आम्हाला तोंड उघडायला लाऊ नका. अन्यथा जाहीर सभेतून याची वाच्यता करेन असा धमकीवजा इशाराही राणे यांनी या वेळी दिला. बाळासाहेबांच्या कर्जत येथील फार्महाऊसवर कोणाकोणाचे मृत्यू झाले हेसुद्धा सांगेन, असेही निलेश राणे यांनी म्हटले आहे.

राणे साहेबांच (नारायण राणे) यांच बाळासाहेबांवर आजही प्रेम आहे. पण, ते त्यांना कधीच व्यक्त करता आले नाही. माझ्यासाठी राणे साहेब महत्त्वाचे बाळासाहेब नाही. मी जरी त्यांना साहेब म्हणत असलो तरी, ते माझे वडील आहेत, त्यामुळे त्यांच्यावर जर कोणी काही बोलत असेल तर, आम्ही ते सहन करणार नाही, असेही निलेश राणे यांनी सांगितले. (हेही वाचा, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शान दाखवणारे 'आया रे ठाकरे' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला)

दरम्यान, रत्नागिरी येथील वाटत येथील जिल्हा परिषद गट शिवसेना मेळाव्यात बोलताना शिवसेना नेते विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर आरोप केले होते. या आरोपांमध्ये नारायण राणेंच्या दहा वर्षातील राजकारणात त्या नऊ जणांचे बळी नेमके कोणी घेतले. हिंमत असेल तर नारायण राणेंनी उत्तर द्या, असं आव्हान राऊत यांनी दिले होते. तसेच, आमची निष्ठा भगवा आणि बाळासाहेबांवर आहे. पैशावर नाही, त्यामुळे आम्ही आमचं इमान विकलं नाही, असेही राऊत यांनी म्हटले होते.

दरम्यान, निलेश राणे यांच्या आरोपांना शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं आहे.