कोरोना व्हायरस संकटकाळात डिजिटल व्यवहारांना अधिक चालना मिळाली. त्यामुळे फसवणूकीचे प्रमाण वाढू लागले.अशातच व्हॉट्सअॅप युजर्संना एक 6 डिजिट नंबर पाठवण्यात येत आहे. हा नंबर चुकून पाठवण्यात आल्याचे मेसेज पाठवणाऱ्याकडून सांगण्यात येत आहे. पूजा सोळंकी या युवतीला शुक्रवारी अशा प्रकराचा मेसेज करण्यात आला. त्यानंतर तिने मुंबई पोलिसांची मदत घेतली. त्यानंतर अशा प्रकारच्या मेसेजपासून सावध राहण्याचे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.
व्हॉट्सअॅप युजर्संना हा मेसेज unknown किंवा known क्रमांकावरुन येऊ शकतो. हा मेसेज असा आहे- हाय, सॉरी, मी चुकून 6 डिजीट कोडचा मेसेज पाठवला. तुम्ही परत मला हा मेसेज पाठवाल का? अर्जेंट आहे. हा मेसेज वाचून कोणत्याही युजरला हे खरे वाटते आणि तो मेसेज पाठवणाऱ्याला फॉरवर्ड करतो. मात्र हा फेक मेसेज असून हा कोड व्हॉट्सअॅप अकाऊंट हॅक करण्यासाठी वापरण्यात येतो.
या मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर करत पूजा सोळंकी हिने लिहिले, व्हॉट्सअॅपवर येणाऱ्या या मेसेजला रिप्लाय करु नका. तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या नावाने जरी हा मेसेज आला असला तरी रिप्लाय करणे टाळा. हा मेसेज हॅकर कडून आला आहे. जर तुम्ही हा कोड शेअर केला तर ते तुमचे व्हॉट्सअॅप अकाऊंट हॅक करतील. यावर मुंबई पोलिसांनी रिट्विट करत लिहिले, अशा प्रकराच्या मेसेजेंना रिप्लाय करुन नका, ते खोटे असतात. अशा प्रकारचे मेसेज आल्यास तुमच्या जवळच्या पोलिस स्थानकात तक्रार दाखल करा.
पहा ट्विट:
Don't entertain such Messages. They may be fraudsters. Request you to report the matter at your nearest police station for necessary action.
— Mumbai Police (@MumbaiPolice) September 18, 2020
हँकींगपासून कसे सावध राहाल?
कोणताही कोड, नंबर किंवा इतर महत्त्वाची माहिती अनोळखी व्यक्तीसोबत व्हॉट्सअॅपवर शेअर करु नका. जर तुम्हाला तुमच्या जवळच्या किंवा ओळखीच्या व्यक्तीच्या नंबरवरुन कोणताही नंबर किंवा मेसज, माहिती आल्यास त्या व्यक्तीला फोन करुन त्याची पडताळणी करा. तसंच आधार कार्ड नंबर किंवा ओटीपी यांसारखी माहिती कोणत्याही व्यक्तीसोबत शेअर करु नका.
दरम्यान, याबाबत पोलिस यंत्रणा सतर्क असून सायबर क्राईम सेलकडून ऑनलाईन फसवणूकीला बळी न पडण्याचे आवाहन वारंवार करण्यात येत आहे.