What Is Red, Orange And Yellow Alert: रेड, ऑरेंज, यलो आणि ग्रीन अलर्ट म्हणजे नेमकं काय? ते कधी जारी केले जातात? जाणून घ्या सविस्तर
Rain | (Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

यंदा मान्सूनने नेहमीपेक्षा लवकरच हजेरी लावली. 5 जून रोजी महाराष्ट्रात दाखल झालेला मान्सून आज मुंबईत धडकला. आज सकाळपासूनच मुंबईत धुव्वाधार पावसाला सुरुवात झाली. कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांतही दमदार पावसाने हजेरी लावली आहे. तसंच पुढील 5 दिवस कोकण किनारपट्टीसह मुंबईला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे आज मुंबईत रेड अलर्ट आणि पुढील 4 दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पण रेड अलर्ट म्हणजे नेमकं काय? रेड अलर्ट जारी केलं म्हणजे नेमकं काय केलं? त्याचबरोबर ग्रीन, यल्लो, ऑरेंज अलर्टही असतात. ते म्हणजे काय आणि ते कधी जारी केले जातात. असे प्रश्न अनेकांना पडलेले असतात.

अतिवृष्टी, महापूर, भूकंप, त्सुनामी यासारख्या नैसर्गिक आपत्तींच्या वेळी प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला जातो आणि परिस्थितीच्या तीव्रतेनुसार, ग्रीन, यलो, ऑरेंज आणि रेड अलर्ट जारी केले जातात. सतर्कतेचा इशारा देण्यासाठी जारी करण्यात येणाऱ्या या अलर्टचा अर्थ जाणून घेऊया...

रेड अलर्ट:

रेड अलर्ट म्हणजे मोठी नैसर्गिक आपत्तीची शक्यता. नैसर्गिक आपत्ती ओढावल्यानंतर किंवा ओढवण्याची शक्यता असल्यास एखाद्या विशिष्ट भागासाठी रेड अलर्ट जारी करण्यात येतो. रेड अलर्ट जारी करण्यात आलेल्या प्रदेशातील स्थानिक प्रशासन, आपत्कालीन यंत्रणांनी अधिक सतर्क रहाणं गरजेचं असतं. संकट अधिक धोकादायक, तीव्र असल्यास, सामान्य जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता असल्यास रेड अलर्ट देण्यात येतो. याचा अर्थ नागरिकांनी धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे आणि स्वत:सह इतरांना सुरक्षित ठेवावं.

ऑरेंज अलर्ट:

कोणत्याही क्षणी नैसर्गिक आपत्ती येऊ शकते आणि त्यासाठी नागरिकांना सतर्क करण्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये वीजपुरवठा खंडीत होणे, वाहतूक ठप्प होणे असे प्रकार होऊ शकतात. तसंच ऑरेंज अलर्टमध्ये गरज असल्यासच बाहेर पडा, असे देखील सांगितले जाते.

यलो अलर्ट:

हवामानातील बदलांमुळे पुढील काही दिवसांत संकट ओढवण्याची शक्यता असल्यास यलो अलर्ट जारी केला जातो. या संकटामुळे दैनंदिन कामावर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे सावधगिरीचा इशारा देण्यासाठी यलो अलर्ट दिला जातो.

ग्रीन अलर्ट:

कोणत्याही संकटाची चाहुल नाही. सारं काही सुरळीत आहे, हे दर्शवणारा ग्रीन अलर्ट असतो. पूर्वी जारी केलेला येलो, ऑरेंज किंवा रेड अलर्ट मागे घेण्यासाठी ग्रीन अलर्ट जारी केला जातो.

आज मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले. रेल्वे वाहतूक ठप्प झाली. मिठी नदी ओसंडून वाहू लागली. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापालिका नियंत्रण कक्षात भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसंच ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर जिल्हाधिकाऱ्यांकडून पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतला आणि वाहतुक सुरळीत करण्यासाठी त्वरीत पाऊलं उचलण्याचे निर्देश दिले आहेत.