Maharashtra Monsoon: मुसळधार पाऊस (Heavy Rain) यंदा तसा फारसा बरसलाच नाही. उशीरा दाखल झालेला मान्सून. त्याने मध्येच घेतलेली विश्रांती यामुळे निसर्गाचे चक्र यंदा काही वेगळ्याच पद्धतीने फिरण्याचे पाहायला मिळाले. परिणामी ऐन पावसाळ्यातही मुंबईसारख्या महाकाय शहरात पाणीकपात करावी लागते आहे. राज्यातील अनेक ठिकाणी यंदा तुटीच्या पावसाचीच नोंद झाली आहे. नाही म्हणायला काही ठिकाणी पाऊस तुरळक प्रमाणात बरसतो आहे. पण तो केवळ नावालाच त्यामुळे कोकण वगळता उर्वरीत महाराष्ट्रात कुठेच पाऊस समाधानकारक झाला नाही. अनेकांना प्रश्न पडला आहे की, आज पाऊस पडेल का? (Will It Rain Today) जाणून घ्या महाराष्ट्रातील पर्जन्यमान.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आदी ठिकाणी पर्जन्यमानात मोठी तूट पाहायला मिळत आहे. आतापर्यंत नोंदवली गेलेली पावसाच्या तुटीची आकडेवारी खालील प्रमाणे-
मराठवाडा- 39% तूट
विदर्भ- 31 % तूट
पश्चिम महाराष्ट्र- 29% तूट
पावसात मोठ्या प्रमाणावर तूट झाल्यामुळे राज्यातील विविध जलाशयांमधील साठाही मोठ्या प्रमाणावर कमी झाला आहे. या जलाशयांमध्ये केवळ 30% इतकाच पाणीसाठा आहे. हिंगोली जिल्ह्यात 83%, सांगली जिल्ह्यात 71%, अकोला जिल्ह्यात 70%, जालना जिल्ह्यात 62% इतकाच पाणीसाठा आहे. महत्त्वाचे म्हणजे हे जिल्हे राज्याच्या 'यलो झोन'मध्ये येतात. पर्जन्यवृष्टीमध्ये 'रेड झोन'मध्ये येणाऱ्या जिल्ह्यांमध्ये चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, गडचिरोली, वाशीम, अमरावती व बुलढाणा जिल्ह्यांचा समावेश आहे. हे सर्व जिल्हे विदर्भात येतात. (हेही वाचा, Maharashtra Weather Forecast: कोकण ते विदर्भ पहा महाराष्ट्रात पुढील 4-5 दिवसांसाठी IMD ने दिलेला हवामान अंदाज)
मृग नक्षत्रावर पाऊस येणार हे पाठिमागील अनेक वर्षांपासूनचालत आलेले गृहितक. त्यात थोडाफार बदल होतो. पण पाऊस येतो. यंदा मात्र काहीच्या काहीच घडले. पाऊस मृग संपला तरी आलाच नाही. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले. सुरुवातीच्या काही काळात पावसाचा शिडकाव आला. त्यावर पुढेही पाऊस येईल या आशेवर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. मात्र, पावसाने ओढ दिल्याने आता दुबार पेरणी करावी लागते की काय, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावू लागली आहे. त्यामुळे शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसला आहे.