भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील दोन दिवसांत पुणे (Pune Weather) आणि सातारा (Satara Weather) येथील घाट परिसरात अति मुसळधार पावसाचा (Heavy Rainfall) इशारा दिला आहे. मान्सूनच्या हालचालींमध्ये घोणाऱ्या लक्षणीय बदलानंतर हा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रात पाठिमागील दोन दिवसांपासून दमदार पावसास पुन्हा एकदा सुरुवात (Weather Forecast Maharashtra) झाली आहे. मुंबई शहर, उपनगर तसेच, ठाणे, रायगड, पालघर आदी जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान, अनुस्कुरा घाटात शुक्रवारी रात्री उशिरा दरड कोसळली (Landslide), ज्यामुळे राजापूर-कोल्हापूर महामार्गावरील (Rajapur-Kolhapur Highway) वाहतूक ठप्प झाली.
मान्सून राज्याभर सक्रिय
राज्यभरात सुरु असलेल्या असलेल्या मुसळधार पावसामुळे येत्या काही दिवसांत आणखी भूस्खलन होण्याची शक्यता आहे, असा इशारा आयएमडीने दिला आहे. "मान्सून राज्याभर सक्रिय आहे, आणि दक्षिण गुजरातपासून दक्षिण केरळच्या किनारपट्टीपर्यंतचा समुद्रकिनारा मान्सूनसाठी अनुकुल आहे," असे IMD पुणे येथील शास्त्रज्ञ एस.डी. सानप यांनी म्हटले आहे. ते पुढे म्हणाले की अरबी समुद्रातून कमी दाबाचा पश्चिम प्रवाह शुक्रवारपासून तीव्र झाला आहे आणि तो पुढील दोन ते तीन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे परिस्थिती आणखी बिघडली आहे, जी पश्चिमेकडे सरकत आहे आणि महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात मान्सूनच्या प्रवाहाला मजबुती देत आहे. (हेही वाचा, Weather Forecast India: देशभरात मुसळधार पाऊस अपेक्षीत, आयएमडीचा ओडिशा, पश्चिम बंगाल, झारखंड, असमसह विविध राज्यांना सतर्कतेचा इशारा)
संपूर्ण महाराष्ट्रात दमदार पाऊस अपेक्षीत
हवामान अंदाज त्यातील बदल आणि मान्सूनच्या घडामोडींवर लक्ष ठेवणाऱ्या एका अभ्यासकाने मह्टले आहे की, बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचे क्षेत्र सध्याच्या मान्सूनच्या पुनरागमनासाठी महत्त्वाचे आहे. हे क्षेत्र जसजसे ते पश्चिमेकडे सरकते तसतसे ते प्रदेशात पावसाची शक्यता वाढते. साधारण 24 ते 26 ऑगस्टपर्यंत कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात मान्सूनची स्थिती सक्रिय होण्याची शक्यता आहे. "रविवारी संपूर्ण महाराष्ट्रात चांगला पाऊस अपेक्षित आहे, परंतु 26 ऑगस्टपासून तीव्रता कमी होऊ शकते, असे ते म्हणाले.
पुण्यात जोराचा पाऊस
दरम्यान, काल म्हणजे 24 ऑगस्ट रोजी पुणे जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली. 24 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5:30 पर्यंत नोंदवलेली पावसाची आकडेवारी पुणे आणि आसपासच्या भागात लक्षणीय पर्जन्यमान दर्शवते. या यादीत गिरीवन 67.5 मिमी पावसासह अव्वल असल्याचे पाहायला मिळते. त्यापाठोपाठ लोणावळा (58 मिमी) आणि लवासा (57.5 मिमी) आहेत. निमगिरी (56.5 मिमी), माळीण (34 मिमी), एनडीए (29 मिमी) आणि लव्हाळे (27 मिमी) सारख्या इतर ठिकाणी देखील लक्षणीय पाऊस झाला. पुण्यातील चिंचवड परिसरात 23.5 मिमी, तर मध्य पुण्याच्या शिवाजीनगर भागात 16मिमी पावसाची नोंद झाली. दौंडमध्ये सर्वात कमी 1 मिमी पाऊस झाला.
आयएमडीकडून सतर्कतेचा इशारा
IMD ने रविवारी पुणे शहरासाठी धोक्याचा आणि सावधानतेचा इशारा दिला आहे. ज्यामध्ये कमी झालेली दृश्यमानता, निसरडे रस्ते, वाहतूक व्यत्यय आणि सखल भागात मध्यम पाणी साचणे यासारख्या बाबी पाहायला मिळतील असे म्हटले आहे. डोंगराळ प्रदेशात झाडांच्या फांद्या पडणे, किरकोळ भूस्खलन आणि चिखलही पाहायला मिळेल, असेही या इशाऱ्यात म्हटले आहे. दरम्यान, नागरिकांनी प्रवास करण्यापूर्वी रहदारीची स्थिती तपासावी, सूचनांचे पालन करावे, पाणी साचलेले क्षेत्र टाळावे आणि असुरक्षित ठिकाणांपासून स्वत:ला दूर ठेवावे, असे म्हटले आहे.
मुंबई शहर, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उपनगरी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील काही भागांमध्ये IMD ने पुढील 24 तासांसाठी परीसरात पूरजन्य स्थिती उद्भवू शकते असे म्हटले आहे. त्यामुळे या प्रदेशातील रहिवासी आणि प्रवाशांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.