
मुंबईच्या बीकेसी येथील जिओ वर्ल्ड सेंटर येथे 1 ते 4 मे दरम्यान ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेन्मेंट समिट’चा (World Audio Visual & Entertainment Summit- WAVES) कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या परिषदेचे यजमानपद महाराष्ट्र शासन भूषवत आहेत. या परिषदेचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. भारतामध्ये माध्यम आणि मनोरंजन उद्योग वेगाने वाढत असून रोजगारनिर्मितीसाठी या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होत आहे. त्याचबरोबर ओटीटी, ॲनिमेशन, गेमिंग, व्हीएफएक्स, चित्रपट, संगीत आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात देश प्रगती करत आहे. या पार्श्वभूमीवर वेव्हज् परिषदेचे आयोजन होत असून या परिषदेत चर्चासत्रे, उद्योगक्षेत्रात गुंतवणूक आणि विविध कार्यक्रम होणार आहे.
वेव्हज् परिषदेत जगभरातून 100 पेक्षा जास्त देश सहभागी होणार आहेत. या परिषदेच्या माध्यमातून भारतातील क्रिएटिव्ह इकॉनॉमीला मोठ्या प्रमाणात चालना मिळण्यास मदत होणार आहे. आर्थिक क्षेत्रात जसे दावोस शिखर परिषदेचे स्थान आहे, तेच मनोरंजन क्षेत्रात वेव्हज शिखर परिषदेला मिळवून देण्याचा दृष्टिकोन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडला होता. त्या दृष्टीने वेव्हज बाजार महत्त्वाचे साधन ठरणार आहे. वेव्हज बाजाराच्या अधिकृत संकेतस्थळावर आतापर्यंत, माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राशी संबंधित विविध क्षेत्रांमधील सुमारे 5,500 खरेदीदार, 2,000 पेक्षा जास्त विक्रेते आणि जवळपास 1,000 प्रकल्पांसाठी नोंदणी केली गेली आहे.
जाणून घ्या कसा असेल कार्यक्रम-
या परिषदेच्या पहिल्या दिवशी ‘भारत व महाराष्ट्र पॅव्हिलियन’ आणि वेव्हज प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून काही महत्त्वपूर्ण घोषणा व सामंजस्य करार (MOU) करण्यात येणार आहे. त्याचबरोबर क्रिएटोस्पिअरचे उद्घाटन आणि ‘वेव्हज बझार’, वेव्हज एक्सलेटर इत्यादींचा प्रारंभ होणार आहे. परिषदेच्या दुसऱ्या दिवशी जागतिक मीडिया संवाद, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमध्ये संवाद तसेच क्रिएट इन इंडिया चॅलेन्जेसची अंतिम फेरी होणार आहे. या परिषदेच्या तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी विविध चर्चासत्रांबरोबरच प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे.
ही परिषद चित्रपट, दूरचित्रवाणी, अॅनिमेशन, गेमिंग, जाहिरात, वर्धित वास्तव (एक्स्टेंडेड रिअॅलिटी), संगीत, ध्वनी संयोजन, नभोवाणी या आणि अशा विविध क्षेत्रांमधील भागधारकांना एकत्र आणणारे एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे. एखादा चित्रपट दिग्दर्शक आपल्या चित्रपटासाठी निर्मिती भागीदाराच्या शोधात असेल, एखादा जाहिरातदार योग्य व्यासपीठाच्या शोधात असेल, एखादा गेम डेव्हलपर गुंतवणूकदाराच्या शोधात असेल किंवा एखादा कलाकार आपल्या कलाकृतींना जागतिक स्तरावरील प्रेक्षकांसमोर सादर करू इच्छित असेल, तर अशा सर्वांसाठी वेव्हज बाजारपेठेचा हा मंच म्हणजे परस्पर संपर्क, सहकार्य आणि व्यवसायवृद्धीचे बहुआयामी व्यासपीठ उपलब्ध करून देणारी मोठी जागा किंवा बाजारपेठ असणार आहे. (हेही वाचा: Maharashtra Stock Market Leadership: भांडवली उभारणीमध्ये महाराष्ट्र अव्वल; FY25 मध्ये 1 लाख कोटींच्या इक्विटी उभारणीत 32% हिस्सा)
मुंबई येथे होणाऱ्या या वेव्हज परिषदेस 100 पेक्षा जास्त देश सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम यापूर्वी झालेल्या जी 20 पेक्षा खूप मोठा असणार आहे. यावेळी भारतातील प्रादेशिक भाषांतील कंटेंट, अॅनिमेशन आणि गेमिंग क्षेत्रातील नवोदित निर्माते आणि कलाकारांना जागतिक प्लॅटफॉर्मवर आपली कला सादर करण्याची संधी मिळेल. Netflix, Amazon, Disney+, Sony Pictures यांसारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबत भागीदारीसाठी मार्ग मोकळे होतील. धोरणकर्ते, गुंतवणूकदार, कलाकार, तंत्रज्ञ आणि उद्योगपती यांच्यात थेट संवादाची संधी उपलब्ध होईल.