पतीच्या निधनानंतर अवघ्या 8 दिवसांत मुलीची हत्या करुन पत्नीची आत्महत्या; वर्धा येथील घटना
Representational Image | (Photo Credits: PTI)

वर्धा (Wardha) जिल्ह्यातील हिंगणघाट (Hinganghat) येथून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर येत आहे. पतीच्या निधनानंतर अवघ्या 8 दिवसांत पत्नीने अडीच वर्षांच्या चिमुकलीची हत्या (Murder) करुन स्वत: आत्महत्या (Suicide) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे परिसरातून एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. कविता मोहदुरे (35) असे या आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. तर हत्या झालेल्या चिमुकलीचे नाव आराध्या मोहदुरे असे आहे.

कविता आपल्या पती व अडीच वर्षी आराध्या यांच्यासह वर्धा येथे वास्तव्यास होत्या. 8 दिवसांपूर्वी त्यांच्या पतीने एका विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. पतीने घेतलेल्या निर्णयामुळे कविता यांना जबर धक्का बसला. त्यानंतर त्या आपल्या अडीच वर्षांच्या मुलीला घेऊन माहेरी हिंगणघाट येथील आशिषनगर येथे राहण्यास गेल्या. मात्र मानसिक त्रासात असलेल्या कविता यांनी गुरुवारी सायंकाळी मुलीची गळा आवळून हत्या केली आणि त्यानंतर राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. (Tamil Nadu: पत्नीच्या चारित्र्यावर संशय; बापाने दोन्ही दोन मुलांना फासाला लटकवून स्वतः केली आत्महत्या, नातेवाईकांना पाठवला व्हिडीओ)

पती विरहाचे दु:ख सहन न झाल्याने कविता यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी गावात चर्चा आहे. तर संपूर्ण कुटुंबाचा 8 दिवसांत झालेला सर्वनाश हृदयद्रावक आहे. दरम्यान, यापूर्वी अशा प्रकारच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. कोरोना संकटात तर यांचे प्रमाण वाढले आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातून अशा प्रकारची घटना समोर आली होती. पतीचे कोरोनामुळे निधन झाल्याने पत्नीने 18 महिन्यांच्या मुलीसोबत आत्महत्या केली होती.