Chhatrapati Shivaji Maharaj's Wagh Nakh (PC - Twitter/@MeghUpdates)

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे (Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakh) सातारा येथे 19 जुलै 2024 रोजी प्रदर्शनासाठी दाखल झाली. आता जवळजवळ 7 महिन्यानंतर ही वाघनखे नागपूरला रवाना झाली. अशाप्रकारे शिवरायांची वाघनखे व शिवकालीन शस्त्र पाहण्याची अपूर्व संधी विदर्भवासियांना नागपूर येथे उपलब्ध करुन देण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील शिवकालीन इतिहास हा प्रत्येकाच्या मनात शौर्याची भावना निर्माण करणारा आहे. राज्यातील गड किल्ले व शिवशस्त्र हे या शौर्याच्या इतिहासाचे दीपस्तंभ म्हणून आजही प्रत्येकाला प्रेरणा देणारे आहेत. या शौर्याच्या गाथेतील प्रत्येक महाराष्ट्रीयांच्या मनामनात जपलेली ही वाघनखे आहेत.

शिवकालीन शस्त्र व वाघनखे प्रदर्शनासाठी येथील मध्यवर्ती संग्रहालय येथे विशेष दालन निर्माण करण्यात आले असून पर्यटकांसाठी सुविधा केंद्राची निर्मिती केली आहे. व्हिक्टोरीया अँड अल्बर्ट वस्तुसंग्रहालय, लंडन येथून सर्वांना पाहण्यासाठी आणलेली वाघनखे व यासोबत शिवशस्त्र हे प्रमुख आकर्षण राहणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन 7 फेब्रुवारी रोजी झाले. त्यानंतर आता नागपूरसह परिसरातील लोक या वाघनखांचे दर्शन घेत आहेत.

महाराष्ट्र सरकारने व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयातून छत्रपती शिवाजी महाराजांचे 'वाघ नख' भारतात तीन वर्षांसाठी आणले आहे. ही वाघनखे नोव्हेंबर 2023 ते नोव्हेंबर 2026 या तीन वर्षांच्या कालावधीकरिता भारतात राहतील. सातारा, नागपूरनंतर ही वाघनखे 3 ऑक्टोबर ते 3 मे 2026 या कालावधीत  कोल्हापुरातील संग्रहालयात प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरच कोल्हापूरकरांना ऐतिहासिक शिवकालीन वाघनखे पाहण्याचा सुवर्ण क्षण अनुभवता येणार आहे. त्यानंतर मुंबई येथे या वाघनखांचे प्रदर्शन होईल. (हेही वाचा: Mahabaleshwar Tourism Festival: महाबळेश्वर येथे 26 ते 28 एप्रिल दरम्यान भव्य पर्यटन महोत्सवाचे आयोजन; पर्यटकांना होणार प्रेक्षणीय स्थळे, स्थानिक कला-संस्कृती, खाद्यसंस्कृतीची ओळख)

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज यांनी याच वाघनख्यांनी अफलजखानाचा कोथळा बाहेर काढला होता असे मानले जाते. दुसरीकडे, शिवाजी महाराजांची जगदंबा तलवारही सध्या ब्रिटनमध्ये आहे. ती परत आणण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. केंद्र सरकारमार्फत ब्रिटन सरकारकडे यासाठी पाठपुरावा केला जात आहे.