विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच पक्षांमध्ये उलथापालथ होत असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग सुरु झाले आहे. इनकमिंग-आऊटगोईंगमध्ये पालघरचे शिवसेना आमदार अमित घोडा (Amit Ghoda) यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. NCP चे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. पक्षाने विधानसभा निवडणुकीचे तिकिट न दिल्याने नाराज झालेल्या अमित घोडा यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
पालघर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अमित घोडा यांनी सेनेचे शिवबंधन तोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शिवसेनेने पालघर विधानसभेसाठी श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी दिल्या कारणाने अमित घोडांनी सेना सोडल्याचे सांगण्यात येत आहे.
पालघर लोकसभा मतदारसंघाचे भाजप पक्षाचे माजी खासदार चिंतामन वनगा यांचे निधन झाल्यानंतर पोटनिवडणुकीसाठी भाजपने काँग्रेसच्या राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे चिंतामन वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. भाजपने दबाव टाकल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी श्रीनिवास वनगा यांना विधानसभेच्या उमेदवारीचे आश्वासन दिले होते. ठाकरेंनी दिलेल्या आश्वासनानुसार आज वनगा यांना विधानसभेसाठी एबी फॉर्म देण्यात आला आहे.
अमित घोडा हे माजी आमदार कृष्णा घोडा यांचे चिंरजीव आहेत. २०१४ साली कृष्णा घोडा यांनी राष्ट्रवादीला सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता. अवघ्या ५०० मतांनी त्यांचा विजय झाला होता. त्यानंतर एकाच वर्षात त्यांचे निधन झाल्यामुळे पोटनिवडणुकीत अमित घोडा आमदार म्हणून निवडून आले होते.