Maharashtra Assembly Elections: भाजप प्रवेश होताच गोपीचंद पडळकर यांना बारामती येथून उमेदवारी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संकेत
Ajit Pawar, Gopichand Padalkar | (Photo credit: Archived, edited, representative images)

Maharashtra Assembly Elections: विधानसभा निवडणूक 2019: वंचित बहूजन आघाडीतर्फे लोकसभा निवडणूक लढलेल्या गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज भाजप (30 सप्टेंबर 2019) प्रवेश (VBA Gopichand Padalkar join BJP) केला. भाजपमध्ये घरवापसी होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोपीचंद पडळकर यांना थेट बारामती मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे बारामती विधानसभा मतदारसंघात या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेते अजित पवार विरुद्ध गोपीचंद पडळकर असा सामना रंगणार, असे दिसते. गोपीचंद पडळकर यांच्या भाजप प्रवेशामुळे वंचित बहुजन आघाडी (VBA) आणि अॅड. प्रकाश आंबेडकर यांना जोरदार धक्का बसला आहे. गोपीचंद पडळकर यांच्यासोबत काँग्रेस नेते काशीराम पावरा यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. (हेही वाचा, 'ईडी'ने कोथळा वाचविण्यासाठी खलिता पाठवून बारामतीकरांशी तह केला: शिवसेना)

लोकसभा निवडणुकीवेळीही बारामती जिंकण्यासाठी भाजपने जोर लावला होता. मात्र, बारामती लोकभा जिंकण्यात भाजपला यश आले नव्हते. या पार्श्वएभूमीवर विधानसभेसाठी अजित पवार यांच्या विरोधात गोपीचंद पडळकर यांना बारामतीतून उतरवण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रयत्न आहेत. गोपीचंद पडळकर हे धनगर समाजाचे नेते म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत. त्यांचा राजकीय उदय महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षातून झाला. पुढे ते भाजपमध्ये सहभागी झाले. विधानसभा निवडणूक 2014 त्यांनी भाजपच्या तिकीटावर लढली. मात्र, पुढे त्यांनी भाजपचा हात सोडत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. आता ते पुन्हा भाजपमध्ये सहभागी झाले आहेत.

गोपीचंद पडळकर यांनी लोकसभा निवडणू वंचित बहुजन आघाडीच्या तिकीटावर लढली होती. त्यांनी भाजप उमेदवार संजयकाका पाटील यांना जोरदार टक्कर दिली होती. मात्र, खरा सामना स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विशालकाका पाटील आणि संजयकाका पाटील यांच्यात रंगल्याने गोपीचंद पडळकर हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. मतांची आकडेवारी लक्षात घेता संजयकाका पाटील पाच लाख आठ हजार मतं मिळवत विजयी झाले. तर, स्वाभिमानीचे विशाल पाटील 3 लाख 44 हजार मतांनी दुसऱ्या क्रमांकावर राहिले. गोपीचंद पडळकरांना तीन लाख मते मिळाली.