विदर्भ, मराठवाड्यातील काही भागात पुढील 48 तासांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता
Image used for representational purpose only | (Photo Credits: PTI)

राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट (Rain Prediction) निर्माण होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातून आग्नेय दिशेने येणारे वारे आणि अरबी समुद्राकडून नैऋत्य दिशेने येणाऱ्या वाऱ्यामुळे विदर्भ तसेच मराठवाड्यातील काही भागांमध्ये पुढील 48 तासांमध्ये अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. याबाबत हवामान विभागाकडून अंदाज वर्तवण्यात आला आहे.

या वाऱ्याच्या प्रभावामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात 30 डिसेंबर रोजी तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच 31 डिसेंबर किंवा 1 जानेवारीपर्यंत या 2 ठिकाणी मुसळधार पाऊस तसेच गारपीट होण्याची शक्यता आहे, असा अंदाज स्कायमेट या खासगी वृत्त संस्थेने वर्तवला आहे. (हेही वाचा - शेतकरी कर्जमाफी: अर्थमंत्री जयंत पाटील यांच्या सांगली जिल्ह्यात 39 हजारपेक्षा जास्त शेतकरी अपात्र)

पुढील 48 तासांमध्ये प्रामुख्याने नागपूर, अकोला, अमरावती, गोंदिया, चंद्रपूर, नांदेड, लातूर, परभणी आणि औरंगाबाद येथे ढगांच्या गडगडाटात पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच मुंबईच्या उपनगरांमध्ये तुरळक पावसाची शक्यता असल्याचंही हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. कोकण, गोवा, ठाणे, डहाणू, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि पुणे येथे हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.