महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde-Fadnavis Government) काल एक परिपत्रक जारी करून, दूरध्वनीवरून संभाषण सुरु करण्यापूर्वी ‘हेलो’ ऐवजी, ‘वंदे मातरम’ (Vande Mataram) शब्द उच्चारण्याचे निर्देश दिले. आता सरकारच्या या निर्णयावर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. एकीकडे सत्ताधारी पक्ष हा त्यांचा मोठा उपक्रम असल्याचे म्हणत आहे, तर दुसरीकडे विरोधक याबाबत अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत. मुंबईत समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार अबू असीम आझमी यांनीही सरकारच्या या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे.
आझमी म्हणाले, ‘मी ‘सारे जहां से अच्छा हिन्दोस्तां हमारा’ नक्कीच बोलेन, पण वंदे मातरम कधीच बोलणार नाही. आम्ही फक्त अल्लाहची उपासना करतो आणि त्याचीच उपासना करू.’ अबू आझमी पुढे म्हणाले, ‘मी ज्या-ज्या वेळी बाळासाहेब ठाकरेंना भेटलो, त्या प्रत्येक वेळी त्यांच्या तोंडून ‘जय महाराष्ट्र’ शब्द ऐकले आहेत. यासंदर्भात खुद्द महाराष्ट्र सरकारनेही जीआर काढला होता. आता शिंदे सरकार ‘जय महाराष्ट्र’ ऐवजी ‘वंदे मातरम’ का म्हणायला का लावत आहे?’
शेवटी ते म्हणाले, ‘एकनाथ शिंदे यांच्या या आदेशावरून लक्षात येत आहे की, ते आता भाजप आणि आरएसएसची भाषा बोलू लागले आहेत की, त्यांच्या दबावाखाली काम करत आहेत.’ भाजप नेते किरीट सोमय्या यांनी वंदे मातरमला विरोध करणाऱ्यांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, आजही काही मुस्लिम नेते ‘वंदे मातरम’ म्हणण्याला विरोध करत आहेत. मात्र बुरखा न घातल्याने मुस्लीम पती आपल्या हिंदू पत्नीची हत्या करतो, आझाद काश्मीरबाबत अनके मुद्दे उठतात, त्याबाबत हे लोक बोलत नाहीत. (हेही वाचा: Vande Mataram: आजपासून वंदे मातरम् अभियानाला सुरुवात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पार पडला उद्घाटन सोहळा)
राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाचा विरोध करत सांगितले की, शिंदे-फडणवीस सरकार लोकांवर अशी जबरदस्ती करू शकत नाही. लोकांना त्यांच्या स्वेच्छेने बोलण्याची परवानगी दिली पाहिजे. सरकार हुकूमशाही वृत्ती स्वीकारू शकत नाही. सरकारी कर्मचाऱ्यांच्या फोन कॉल्सला उत्तर देताना वंदे मातरम म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे. वंदे मातरमच्या मुद्द्यावरून काँग्रेस पक्षाचे नेते चरणसिंग सप्रा यांनीही सरकारवर ताशेरे ओढले. ते म्हणाले, ‘आम्ही वंदे मातरमच्या विरोधात नाही, मात्र, जय महाराष्ट्र म्हणण्याच्या आदेशाचे काय होणार? शिंदे सरकारला जय महाराष्ट्र करायला काय हरकत आहे?.’