भाजपमध्ये बंडखोरी, दहा दिवसांत 100 नेत्यांची हकालपट्टी; शिस्तभंगाच्या आरोपाखाली नेतृत्वाकडून कारवाई
BJP Logo | (Photo credit: Archived, edited, representative images)

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Elections 2019) पक्ष नेतृत्वाने अनेक प्रयत्न करुनही भाजपसमोरील बंडखोरीचा धोका टळला नाही. या बंडखोरांमुळे युतीधर्मात मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे या बंडखोरांवर महाराष्ट्र भाजपा (Maharashtra BJP) काय कारवाई करणार याबाबत उत्सुकता आहे. दरम्यान, उत्तराखंड भाजपने मात्र अशा बंडखोरांवर जोरदार कारवाई केली आहे. उत्तराखंड भाजपा (Uttarakhand BJP) पक्षनेतृत्वाने बंडखोरी करत पक्षाला आव्हान देणाऱ्या तब्बल 96 नेत्यांची हाकालपट्टी केली आहे. पक्षशिस्तीचे उल्लंघन करणाऱ्या या नेत्यांवर अवघ्या 10 दिवसांत ही कारवाई करण्यात आली आहे. अवघ्या 10 दिवसांत 96 नेत्यांवर कारवाई झाल्याने पक्षातील इतर बंडखोरांना योग्य तो संदेश गेल्याचे पक्षांतर्गत वर्तुळात बोलले जात आहे.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पक्षाला माहिती मिळाली होती की, हे सर्व नेते पंचायत निवडणूकीत पक्षाच्या उमेदवाराविरोधात उमेदवारी करत होते. सांगितले जाते की, उत्तराखंड भाजपाच्या इतिहासात एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येने पक्षनेतृत्वाने कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ आहे. पक्षनेतृत्वाची एक बैठक येत्या 14 ऑक्टोबर रोजी देहरादून येथे पार पडणार आहे. या बैठकीत निवडणूक आणि पक्षशिस्तीबाबत मंथन केले जाण्याची शक्यता आहे.भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम जाजू यांच्याशिवाय मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत हेसुद्धा या बैठकीस उपस्थित राहणार असल्याचे समजते. याशिवाय राज्यातील आमदार, खासदार आणि पक्षाचे इतर स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारीही या बैठीक उपस्थित राहणार आहेत.

पक्षशिस्तीचे उल्लंघन करणाऱ्यांना कठोर संदेश जावा यासाठीच पक्ष नेतृत्वाने ही कारवाई केल्याचे मानले जात आहे. भाजपचे राज्य सरचिटणीस राजेंद्र भंडारी यांनी रायपूर येथील आमदार उमेश शर्मा यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. त्या आधी एक ऑडियो क्लिप व्हायरल झाली होती. ज्यात आमदार उमेश शर्मा पक्षातील इतर कार्यकर्त्यांना आपल्या उमेदवाराविरुद्ध मतदान करण्यास सांगत होते. दरम्यान, पक्षाने ज्या नेत्यांची हकालपट्टी केली आहे त्यात 21 उधमपुर सिंह नगर, 14 टिहरी, 13 चमोली, 12 अलमोडा, 9 नैनीताल, 6 बागेश्वर, 5 पौडी आणि चंपावत, पिथौरागढ, देहरादून येथून प्रत्येकी 4-4 नेत्यांचा समावेश आहे. (हेही वाचा, विधानसभा निवडणूक 2019: बंडोबांचे थंडोबा करण्यात सर्वपक्षीयांना अपयश; विदर्भात भाजप-शिवसेनेला अधिक फटका)

दरम्यान, महाराष्ट्रात सध्या विधनसभा निवडणूक सुरु आहे. या निवडणुकीत अनेक ठिकाणी भाजपा नेत्यांनी बंडखोरी केली आहे. अनेक मतदारसंघात स्वत:च्या पक्षाच्या विरोधातच पक्षनेते उमेदवारी करत आहे. पक्षादेश डावलून या नेत्यांनी अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय घेतल्याने पक्षाच्या उमेदवाराची गोची झाली आहे. भाजपला बंडखोरीचा सर्वाधिक फटका विदर्भात बसला आहे. तर, काही ठिकाणी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी राजनामास्त्र काढले आहे. काही ठिकाणी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या उमेदवाराचे काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्र भाजपा नेतृत्व उत्तराखंड भाजपा प्रमाणे महाराष्ट्रातही कडक कारवाईचे धोरण अवलंबणार का? याबाबत उत्सुकता आहे.