Aarey Colony (Photo credits: Video grab)

मानवाच्या हस्तक्षेपामुळे हवामानात बदल होत असल्याचे, ग्लोबल वॉर्मिंग वाढत असल्याचे अनेक निराशाजनक अहवाल समोर आले आहेत. ठिकठिकाणी झाडे तोडून सिमेंटचे जंगल उभे राहत आहे. मुंबईसह (Mumbai) भारतामधील अनेक मोठ्या शहरांची स्थिती अशीच आहे. जिकडे पाहाल तिकडे इमारती उभ्या असलेल्या दिसतात. अशात आता संयुक्त राष्ट्रांच्या (UN) अन्न आणि कृषी संघटनेने (FAO) 'ट्री सिटीज ऑफ द वर्ल्ड’ (Tree Cities of the World) नावाची एक यादी जाहीर केली आहे, ज्यामध्ये महाराष्ट्राची राजधानी मुंबईचा समावेश करण्यात आला आहे.

21 देशांतील 138 शहरांच्या यादीत मुंबईचा समावेश करण्यात आला आहे. यावरून हे स्पष्ट होते की, कधीही न झोपणारे शहर वेगाने विकसित होणाऱ्या शहरी जंगलांमध्ये आपली हिरवळ टिकवून ठेवण्यात यशस्वी ठरले आहे. आर्बर डे फाऊंडेशन सोबत, FAO ने या शहरांना वृक्ष वाढवण्याच्या आणि त्यांची देखभाल करण्याच्या वचनबद्धतेबद्दल प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले आहे. या शहरांनी जनतेला राहण्यासाठी निरोगी आणि आनंदी ठिकाणे निर्माण केली आहेत.

मुंबईमधील हिरवळीबाबत आर्बर डे फाऊंडेशनचे सीईओ, डॅन लांबे यांनी बीएमसीच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आहे. त्यांनी बीएमसीचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांना पत्र लिहिले आहे की, ‘मुंबईला 2021 मध्ये पहिल्यांदा वृक्षांचे शहर अशी ओळख मिळवून दिल्याबद्दल आम्ही तुमचे अभिनंदन करतो. हे शहर आता महत्त्वाच्या जागतिक नेटवर्कचा भाग आहे, जे शहरी आणि सामुदायिक वनीकरणात आघाडीवर आहे.’ (हेही वाचा: जळालेला ऊस पाहून 65 वर्षीय महिलेचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू)

ते पुढे म्हणाले, ‘आता पूर्वीपेक्षा जास्त, झाडे आणि जंगले हे जगभरातील निरोगी, राहण्यायोग्य शहरांचे एक महत्त्वाचे घटक झाले आहेत. प्रभावी शहरी वन व्यवस्थापनासाठी मुंबईची बांधिलकी तेथील रहिवाशांचे चांगले भविष्य सुनिश्चित करण्यास मदत करत आहे.’ ‘जबाबदारी’, ‘नियम’, ‘जे आहे ते टिकवून ठेवणे’, ‘संसाधनांचे वाटप’ ‘ग्रीन अचिव्हमेंट्स साजरे करा’, अशा पाच मानकांवर शहराचे मूल्यमापन केले होते.