Osmanabad: जळालेला ऊस पाहून 65 वर्षीय महिलेचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू
Burnt Sugarcane (PC - प्रतिकात्मक प्रतिमा)

Osmanabad: कळंब तालुक्यात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी ऊस वेळेवर कारखान्याला जात नसल्याने हैराण झाले आहेत. अशातचं उस्मानाबादमधील सौंदणा येथे जळालेला ऊस पाहून एका महिलेचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. अंजनाबाई माणिकराव पाचपिंडे असं या महिलेचे नाव असून त्या 65 वर्षाच्या होत्या.

प्राप्त माहितीनुसार, कळंब तालुक्यातील सौंदणा (अंबा) येथील दत्ता माणिकराव पाचपिंडे यांनी त्यांचे चुलते भगवान पाचपिंडे यांचे शेत वाट्याने केले होते. या शेतातील 3 एकर ऊस शुक्रवारी शॉर्टसर्किटमुळे जळाला. सदरील उसाचा सर्व खर्च वाटेकऱ्याकडे होता. त्यामुळे दत्ता पाचपिंडे यांचे मोठे नुकसान झाले. त्यातचं चार दिवसांपासून कुठल्याही कारखान्याची तोड मिळत नसल्याने ऊस शेतातचं उभा होता. यामुळे दत्ता पाचपिंडे यांच्या आई अंजनाबाई माणिकराव पाचपिंडे या तणावात होत्या. त्यांना रविवारी पहाटे हृदयविकाराचा झटका आला. (हेही वाचा - Anil Parab On Silver Oak Attack Case: शरद पवार यांच्या निवासस्थानावर हल्ला करणाऱ्या 109 कामगारांना सेवेत घेणे अशक्य - अनिल परब)

दरम्यान, अंजनाबाई यांना पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथे नेण्यात आले होते. मात्र, आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला. एकीकडे पाचपिंडे यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेला. तर दुसरीकडे डोक्यावरील मायेचे छत्र हरवले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अंजनाबाई यांना त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

विशेष म्हणजे अद्याप पाचपिंडे यांच्या शेतातील जळालेला ऊस आणखी तसाचं उभा आहे. भगवान पाचपिंडे यांच्या नावे बिगरसभासद म्हणून नॅचरल शुगरला नोंद दिलेली आहे. मात्र, नॅचरल शुगरने उसाची प्रचंड उत्पादकता पाहता बिगर सभासदांचा ऊस गाळायचा नाही, असे धोरण ठरवले आहे. तसेच येडेश्वरी शुगरचे दत्ता पाचपिंडे हे सभासद आहेत. परंतु, येडेश्वरी शुगरने मालकतोड करून ऊस गाळपासाठी आणावा यासाठी परवानगी दिली आहे. परंतु, सध्या आई अंजनाबाईचा मृत्यू झाल्याने आम्ही ऊस कसा तोडायचा असा प्रश्न दत्ता पाचपिंडे यांना पडला आहे.