महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता सत्ता स्थापनासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. याच पार्श्वभुमीवर महाराष्ट्रात सत्ता स्थापन न झाल्यास 7 नोव्हेंबर पासून राष्ट्रपती राजवट लागू होईल असे भाजपचे (BJP) नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी म्हटले आहे. त्यावरुन मुनगंटीवार यांनी शिवसेनेला सुचक इशारा दिला आहे. सत्ता स्थापनासाठी भाजप शिवसेनेवर (Shiv Sena) दबाब टाकत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. एवढेच नाही तर दिवाळी मुळे चर्चेला उशीर झाला असल्याचे ही मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
गेल्या पाच वर्षापू्र्वी 31 ऑक्टोबरला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. मात्र यावेळी 31 ऑक्टोबर उलटून गेली तरी सत्तास्थापनेवरुन युतीमध्ये वाद दिसून येत आहे. त्यामुळे मंत्रीपदाचा शुभमुहूर्त कधी ठरणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. त्याचसोबत भाजप-शिवसेना युतीमध्ये मुख्यमंत्री पदावरुन 50-50 चा फॉर्म्युला पहायला मिळणार का हे महत्वाचे ठरणार आहे.(भाजप नेत्याकडून शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न; ट्विटरवर शेअर केले व्यंगचित्र)
दुसऱ्या बाजूला शिवसेनेने मुख्यमंत्री पद आम्हाला देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. तसेच आदित्य ठाकरे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून होर्डिंग्स सुद्धा मुंबईत झळकवण्यात आले होते. मात्र आता हे होर्डिंग्स महापालिकेने काढून टाकले आहेत. तरीही शिवसेनेचे वरिष्ठ नेते संजय राउत यांनी मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल असे विधान केल्याने चर्चांना उधाण आले आहे. त्याचसोबत शिवसेनेने ठरवल्यास बहुमत ही सिद्ध करु शकतो असे ही राउत यांनी म्हटले आहे.