Uddhav Thackeray Live: ग्रीन,ऑरेंज झोन मधील उद्योगांना परवानगी, जिल्हाबंदीचे नियम ते हेल्पलाईन नंबर! उद्धव ठाकरे यांच्या महत्वाच्या घोषणा
Uddhav Thackeray (Photo Credit: Facebook)

Coronavirus In Maharshtra: महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी लाईव्ह च्या माध्यमातून आज राज्यातील नागरिकांना धीर देण्याचे काम केले. उद्या 20 एप्रिल पासून राज्यात काही प्रमाणात लॉक डाऊनचे नियम शिथिल करण्याबाबत आज उद्धव ठाकरे यांनी काही घोषणा लाइव्हच्या माध्यमातून केल्या आहेत. राज्यातील ग्रीन (Green Zone) आणि ऑरेंज झोन (Orange Zone) मध्ये येणाऱ्या जिल्ह्यांमध्ये काही प्रमाणात उद्योगांना काम करण्याची परवानगी दिली जाणार आहे. मात्र असे असले तरी नागरिकांनी घरातून बाहेर पद्मावार पाबंदी आहे तसेच जिल्हाबंदीचे नियम देखील शिथिल केले जाणार नाहीत असे आज उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच लॉक डाऊन काळात महाराष्ट्रातील जनतेला मानसिक वैफल्य आले असल्यास त्यावर उपचारासाठी सरकारी व स्वयंसेवी संघटनांच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या हेल्पलाईन क्रमांकाविषयी सुद्धा उद्धव ठाकरे यांनी माहिती दिली आहे. कोरोनाचे लेटेस्ट अपडेट्स जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

ग्रीन,ऑरेंज झोन मधील उद्योगांना परवानगी

महाराष्ट्रातील अर्थचक्र थांबून राहिल्यास कोरोनाच्या पश्चात मोठे आर्थिक संकट येऊ शकते असे होऊ न देण्यासाठी आता काही प्रमाणात उद्योगांचे काम सुरु करण्यात येणार आहे, यासाठी ग्रीन आणि ऑरेंज झोन म्हणजेच जिथे कोरोनाचे रुग्ण नाहीत किंवा अगदी कमी आहेत तिथे उद्योग सुरु केले जाणार आहेत. यावेळी केवळ एक अट असेल की जर का उद्योगांना सरकारची मदत हवी असेल तर त्यांना आपल्या मजुरांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असणार आहेत. असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.

जिल्हाबंदीचे नियम

मालवाहतूकीला परवानगी देत असलो तरी जिल्ह्याचा सीमा उघडणार नाही आहोत.उद्योगासाठी जिल्ह्यांतर्गत प्रवास करू शकता मात्र एका जिल्ह्यातील लोक दुसऱ्या जिल्ह्यात जाऊ शकणार नाहीत, या संदर्भात ३ मे पर्यंत तरी काहीच बदल केले जाणार नाहीत. असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्रातील जनतेसाठी हेल्पलाईन क्रमांक

मुंबई महापालिका आणि बिर्ला यांच्या विद्यमाने मानसिक मदत देण्यासाठी 1800-120-8200-50  हा नंबर सुरु करण्यात आला आहे.

तसेच, आदिवासी विभाग, प्रफुल्ल, मुंबई प्रोजेक्ट या संस्थांच्या तर्फे सुद्धा 1800-102-4040  हा हेल्पलाईन क्रमांक सुरु करण्यात आला आहे.

दुसरीकडे, घरगुती हिंसाचार, मानसिक छळाच्या घटनांच्या वाढत्या तक्रारी पाहता महिलाना तक्रार करण्यासाठी 100क्रमांक सज्ज करण्यात आला आहे. यावर महिला भगिनी संपर्क साधून मदत मिळवू शकता असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.

स्थलांतरित कामगारांना दिलासा

स्थलांतरित कामगारांसाठी केंद्र सरकारशी चर्चा सुरु आहेत, तोपर्यंत महाराष्ट्र्र सरकार या कामगारांची काळजी घेईल, आणि जेव्हा हे कामगार घरी परततील तेव्हा त्यांच्या मनात भीती नसेल आणि आनंदाने घरी जातील अशी आम्ही तरतूद करू असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान आतापर्यंत, राज्यात 66,796 कोरोना टेस्ट झाल्या आहेत त्यातील 95% टेस्ट या निगेटिव्ह आल्या आहेत. पण लोकांकडून लक्षणांच्या बाबत कुठेतरी अजूनही दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाची किंवा सर्दी खोकल्याची लक्षणे दिसल्यास त्वरित रुग्णालयात मदत मिळवावी असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे.