मुख्यमंत्री पदावर असताना सरकार चांगले चालले होते. अचानक एक दिवस शारीरिक व्याधी सुरु झाल्या. मला शस्त्रक्रिया करावी लागली. ती अवस्था इतकी विचित्र होती की, मला हालचालच करता येत नव्हती. त्याचाच फायदा घेत काहींनी माझी शारीरिक हालचाल थांबलेली पाहून पक्षविरोधी कारवाया सुरु केल्या. आज ते शिवसेनेतून (Shiv Sena) फुटले आहेत, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Thackeray Interview) यांनी म्हटले आहे. दैनिक सामनाचे संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या वेळी उद्धव ठाकरे बोलत होते. माझी शारीरिक प्रकृती सुधारावी म्हणून अनेक लोक प्रार्थना करत होते. दुसऱ्या बाजूला मी यातून बाहेरच येऊ नये. माझी स्थिती अशीच राहावी यासाठी देव पाण्यात बुडवून बसले होते, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांना लगावला.
आपण आजारी असताना सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला? असे विचारले असता संजय राऊत म्हणाले. त्या विषयावर बोलूच का? कारण अशा विषयांवर बोलून मला मला त्या अनुभवातून कुठेही सहानुभुती नको आहे. पण खरोखरच मी आजारी असताना सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला होता, असे उद्धव ठाकरे म्हणाले. (हेही वाचा, Uddhav Thackeray Interview Live streaming: शिवसेनेतील बंडखोरीनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पहिलीच मुलाखत, कुठे पाहाल?)
आजारपणातील अनुभव प्रचंड वाईट होता. माझी मानेची शस्त्रक्रिया झाली. अनेकांना यातील धोक्यांबाबत माहिती नाही. ज्यांना यातील कळते अशा डॉक्टरांशी आपण बोलाल तर तुम्हाला कळेल. पण या शस्त्रक्रियेला सामोरे जाण्याचे मी ठरवले. त्यातून व्यवस्थीत बाहेर पडलो. प्रकृती सुधारत होती. पण इतक्यात एक दिवशी सकाळी मी आळस देण्याचा प्रयत्न करत असताना माझ्या लक्षात आले मानेत वेदना होत आहेत. त्यानंतर इतकी वाईट अवस्था झाली की, माझी मानेखालची सर्व हालचालच बंद झाली, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.
पुढे बोलताना उदधव ठाकरे म्हणाले, माझी अवस्था इतकी बिकट झाली होती. मला श्वासही घेता येत नव्हता आणि पोटही हालत नव्हते. रक्ताची गुठळी तयार झाली होती. सुदैवने डॉक्टर जागेवर होते. त्यामुळे ‘गोल्डन आवर’मध्ये (Golden hour) ही शस्त्रक्रिया पार पडली. त्यामुळेच तर मी आपल्या समोर आहे. त्या काळात काही गोष्टी माझ्या कानावर येत होत्या. माझे हातपाय हालत नव्हते, बोटं हलत नव्हती. त्यावेळी काही लोक मी बरा व्हावा म्हणून देवासमोर अभिषेक करत होते आणि काहीजण मी असाच राहावा म्हणून देव पाण्यात बुडवून बसले होते. देव पाण्यात बुडवून बसलेले आज पक्ष बुडवायला निघाले आहेत. तेव्हा हा आता उभा राहणार नाही, असं पसरवलं जात होतं. तसेच तुझं काय होणार असं बोललं जात होतं, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
नेमकं चुकलं कोठे? असे विचारले असता उद्धव ठाकरे म्हणाले आमची एकअडचण आहे. आम्ही पक्ष व्यावसायीपणे चावलत नाही. विश्वासावर चालवतो. एकदा का एखाद्यावर विश्वास टाकला की, आम्ही त्यांना मोकळीक देतो. पण त्याचा फायदा घेत अनेकजण विश्वासघात करतात. आम्हाला माँ आणि बाळासाहेबांनी हेच शिकवले आहे. विश्वास टाकावा आणि विश्वासानेच काम करावे.