उद्धव ठाकरे सरकारच्या थेट सरपंच निवड प्रक्रिया रद्द करण्याच्या  निर्णयाला 9000 ग्रामपंचायती कडून विरोध
CM Uddhav Thackeray | (Photo Credits: Twitter)

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळतच देवेंद्र फडणवीस  (Devendra Fadnavis) सरकारच्या कार्यकाळातील अनेक निर्णयांना ब्रेक लावला होता. यातीलच एक अलीकडचा निर्णय म्हणजे थेट सरपंच निवड प्रक्रिया रद्द करत त्या जागी प्रातिनिधिक निवड होणार असे सांगण्यात आले होते. या निर्णयाला महाराष्ट्रातील तब्बल 9000 ग्रामपंचायतींनी विरोध दर्शवला आहे. महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे (Maharashtra State Sarpanch Parishad) अध्यक्ष दत्ता काकडे (Dutta Kakde)  यांनी सोमवारी, 27 जानेवारी रोजी याबाबत माहिती देत, 9000 ग्रामपंचायतींकडून ठाकरे सरकारच्या या निर्णयाच्या विरुद्ध हा ठराव मंजूर केला असल्याचे सांगितले. आजच्या दिवसाचे अपडेट्स जाणुन घ्या एका क्लिक वर

प्राप्त माहितीनुसार, 2017 मध्ये फडणवीस सरकारने महाराष्ट्र ग्रामपंचायत कायद्यात सुधारणा करून थेट सरपंच निवड प्रक्रिया लागू केली होती, यानुसार गावकरी थेट सरपंच निवडून देत होते, मात्र हा निर्णय बदलून उद्धव ठाकरे यांनी यापुढे थेट निवडणूक होणार नसून ग्रामपंचायतीत लोकांनी निवडून दिलेलं प्रतिनिधी मग आपापसात सरपंचाची निवड करतील असा नियम लागू केला. उद्धव ठाकरे यांनी याबाबत घोषणा करताना, गावात काही राजकीय पक्षांकडून तसेच स्थानिक पुढाऱ्यांकडून लोकांवर दबाव आणला जातो असे सांगितले होते आणि म्ह्णूनच यापुढे नगर परिषदेसोबतच ग्रामपंचायतीत देखील प्रातिनिधिक निवडणूक होईल असे सांगण्यात आले होते.

दरम्यान, 2017 मध्ये जेव्हा हा निर्णय लागू करण्यात आला होता तेव्हा भाजप आणि शिवसेना युती महाराष्ट्रात कार्यरत होती, मात्र त्या वेळेस सुद्धा उद्धव ठकरे यांनी या निर्णयाला विरोध दर्शवत अशा प्रकारे तर उद्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री देखील थेट निवडीने ठरवावा असे म्हंटले जाईल, पण ते योग्य असेल का असा सवाल उचलला होता.