उदयनराजे भोसले म्हणतात 'शरद पवार आणि पडळकर त्यांचे ते बघून घेतील, मला माझ्या पुरतेच विचारत जा'
Udayanraje Bhosale | (Photo credit: archived, edited, representative image)

भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर विविध स्तरातून संताप व्यक्त झाला. यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते कार्यकर्ते, विविध संघटना आणि दस्तुरखूद्द भाजपमधीलही काही नेत्यांचा समावेश आहे. दरम्यान, या सगळ्या वादात भाजपचे नवनिर्वाचीत राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) काय प्रतिक्रिया देतात याबाबत उत्सुकता होती. या वादावर उदयनराजे भोसले यांनी पहिल्यांदाच मत व्यक्त केले. उदयनराजे भोसले म्हणाले की, 'शरद पवार आणि पडळकर त्यांचे ते बघून घेतील, मला माझ्या पुरतेच विचारत जा'.

उदयनराजे भोसले यांनी सातारा जिल्हा बँक अध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेतली. दोघांमध्ये सातारा बँक कार्यालयात भेट झाली. या भेटीनंतर उदयनराजे भोसले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी पत्रकारांनी शरद पवार आणि पडळकर यांच्याबाबत उदयनराजे यांना विचारले. यावर उदयनराजे म्हणाले, 'मी माझं मत परखडपणेच मांडत असतो. ज्यांनी शरद पवार यांच्याबाबत विधान केले त्यांनी ते विधान करताना मला विचारले नव्हते. त्यामुळे मला माझ्यापूरतंच विचारा. शरद पवार आणि पडळकर त्यांचे ते बघून घेतील.' (हेही वाचा, गडकिल्ले भाड्याने देण्यात काहीच गैर नाही; त्याने नक्कीच अर्थव्यवस्था सुधारेल: उदयनराजे भोसले)

उदयनराजे भोसले यांच्या एकूण राजकीय जीवनाचा विचार करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ते प्रदीर्घ काळ राहिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर ते लोकसभेत प्रदीर्घ काळ खासदार राहिले आहेत. अगदी 2019 च्या अटीतटीच्या लढतीतही उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकीटावरुन लोकसभेवर निवडूण गेले. विशेष असे की या निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांची मोठी पिछेहाट झाली. जनमत भाजप आणि शिवसेनेच्या बाजूचे असतानाही सातारच्या जनतेने उदयनराजे भोसले यांना निवडून दिले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर निवडूण येऊनही अवघ्या तीन, चार महिन्यांमध्ये त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आणि भाजप प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या श्रीनिवास पाटील यांच्याकडून उदयनराजे भोसले यांचा पराभव झाला. भाजपने त्यांचे राज्यसभेवर पुनर्वसन केले. ही सर्व पार्श्वभूमी पाहात उदयनराजे भोसले पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या वक्तव्यावर काय प्रतिक्रिया देतात याबाबत उत्सुकता होती.