Nashik: विजेचा धक्का लागल्याने दोन शिवभक्तांचा दुर्देवी मृत्यू; नाशिक येथील धक्कादायक घटना
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-Facebook)

महाराष्ट्रात (Maharashtra) आज शिवजयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असताना नाशिक (Nashik) येथून धक्कादायक माहिती समोर आली आहे. नाशिकच्या वडनेर रोडवरील (Wadner Road) राजवाडाकडे जाणाऱ्या चौकात शिवजन्मोत्सव समितीचा फलक पावसामुळे खाली पडला होता. हा फलक उचलण्यासाठी गेलेल्या दोन शिवभक्तांचा घात झाला आहे. विजेचा धक्का (Electric Shock) लागल्याने या दोघांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. तसेच इतर दोघेजण किरकोळ जखमी झाल्याचे समजत आहेत. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

अक्षय किशोर जाधव (वय, 26) आणि राज मंगेश पाळदे (वय, 20) असे मृत तरूणांची नावे आहेत. अक्षय वडनेर गाव तर, राज हा सौभाग्यनगर येथे राहायला होते. वडनेर रोडवरील राजवाडाकडे जाणाऱ्या चौकात शिवजन्मोत्सव समितीचा फलक लावलेला होता. गुरुवारी झालेल्या अवकाळी पाऊस आणि जोरदार वाऱ्याने हा फलक पडला. मात्र, आज रस्त्याने जात असताना अक्षय आणि राज यांना शिवजन्मोत्सव समितीचा फलक खाली पडलेला दिसला. दरम्यान, हा फलक उचलत असताना फलकाच्या वरून जाणाऱ्या वीज तारेचा या फलकाला स्पर्श झाला. ज्यामुळे अक्षय आणि राज यांच्यासह चौंघाना विजेचा धक्का लागला. त्यानंतर नागरिकांना चौघांनाही बिटको रुग्णालयात दाखल केले. मात्र, अक्षय आणि राज या दोघांचा मृत्यू झाला आहे. हे देखील वाचा- नांदेड: प्रेमसंबंधास नकार दिल्याच्या कारणावरून प्रेयसीने केली प्रियकराची हत्या

या घटनेने शहरात हळहळ व्यक्त होत आहे. मयत राज पाळदे हा एकुलता एक मुलगा होता तर जाधव यांच्या पच्छात दोन भाऊ आहेत. सर्व शिवभक्त, नागरिक, अनेक पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी रुग्णालयात एकच गर्दी केली होती. यासंदर्भात न्युज 18 लोकमतने वृत्त दिले आहे.