Top Cities for Women in India: भारतातील विविधता, इक्विटी आणि समावेशन (DEI) सोल्यूशन्स कंपनी ‘अवतार ग्रुप’चा (Avtar Group) महिलांशी निगडीत एक अहवाल समोर आला आहे. ज्यामध्ये पुण्याबाबत (Pune) एक दिलासादायक बाब आहे. कंपनीने अलीकडेच 'टॉप सिटीज फॉर वुमन इन इंडिया (TCWI)' निर्देशांकाची तिसरी आवृत्ती जाहीर केली. यामध्ये महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर पुण्याने, भारतातील नोकरदार महिलांसाठी सर्वात समावेशक, सुरक्षित असलेल्या पहिल्या पाच भारतीय शहरांमध्ये स्थान मिळवले आहे. पुण्याने कार्यक्षम प्रशासन आणि नोकरी करणाऱ्या महिलांसाठी उच्च दर्जाचे जीवनमान याबाबत उच्च गुण मिळवले आहेत.
या यादीत बेंगळुरूने पहिला क्रमांक प्राप्त केला आहे. टॉप 10 शहरांमध्ये बेंगळुरूनंतर चेन्नई, मुंबई, हैदराबाद, पुणे, कोलकाता, अहमदाबाद, दिल्ली, गुरुग्राम आणि कोईम्बतूर यांचा समावेश आहे. या अहवालासाठी, फोकस ग्रुप चर्चा (FGDs) आणि फेब्रुवारी 2024 ते नोव्हेंबर 2024 दरम्यान 60 शहरांमधील 1,672 महिलांच्या सहभागासह देशव्यापी सर्वेक्षण करण्यात आले.
पत्रकार परिषदेत बोलताना, अवतार ग्रुपच्या संस्थापक-अध्यक्षा डॉ. सौंदर्या राजेश म्हणाल्या, शहरे ही संधीचा पाया आहेत. महिलांनी कसे राहावे, काम करावे आणि कशी भरभराट करून घ्यावी हे शहरेच ठरवतात. महिलांना सर्वसमावेशक, पूरक, पोषक आणि सुरक्षित वातावरण निर्माण करून देणे ही शहरांची गरज आहे.
त्या पुढे म्हणतात, म्हणून, महिलांच्या प्रगती आणि समावेशासाठी आपल्या शहरांच्या मुख्य तत्त्वांची आणि सांस्कृतिक रचनेची स्पष्ट समज असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अवतारचा वार्षिक निर्देशांक- 'भारतातील महिलांसाठी शीर्ष शहरे', डेटा-केंद्रित आणि पुराव्यावर आधारित दृष्टिकोन वापरून हेच करतो. 2047 पर्यंत विकसित भारताचे आपले स्वप्न साकार करण्यासाठी, आपल्याला भारतीय महिला व्यावसायिकांनी पुरुषांच्या बरोबरीने यशस्वी होण्याची आवश्यकता आहे. (हेही वाचा: Pune Real Estate: पुण्यातील घरांची सरासरी किंमत 6,590 रुपये प्रति स्क्वेअर फूट; आतापर्यंतच्या उच्चांकावर, विक्री घटली- Reports)
त्यांनी नमूद केले, हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा शहरे खरोखरच लिंग-समावेशक असतील आणि महिलांच्या ताकदीचा वापर करता येईल असे वातावरण प्रदान करतील. याचा अर्थ केवळ सुरक्षित रस्ते, सुलभ आरोग्यसेवा आणि शिक्षण आणि महिलांसाठी परवडणारे जीवनमान प्रदान करणे इतकेच नाही, तर महिलांच्या आर्थिक यशासाठी आणि व्यावसायिक नेत्या म्हणून त्यांच्यासाठी संधी निर्माण करणे देखील महत्वाचे आहे.