Housing Society | प्रातिनिधिक-संग्रहित-संपादित प्रतिमा)

विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्याने (Pune) गेल्या काही वर्षांमध्ये आयटी क्षेत्रामध्ये बरच प्रगती केली आहे. दिवसेंदिवस पुणे झपाट्याने वाढत चालले आहे. नुकतीच बातमी आली होती की, गर्दी आणि रहदारीने त्रस्त असलेल्या शहरांमध्ये पुण्याचाही नंबर लागतो. आता पुण्यातील घरांच्या किंमतीही आकाशाला भिडत असल्याचे दिसत आहे. पुण्यातील निवासी मालमत्तेचा सरासरी दर (Average Housing Price) 6,590 रुपये प्रति चौरस फूट या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचला आहे. हा 2024 मध्ये वार्षिक 11 टक्क्यांनी वाढला आहे. गेरा डेव्हलपमेंट्सच्या अहवालातून ही बाब समोर आली आहे.

पुण्याच्या निवासी क्षेत्रावरील द्वि-वार्षिक अहवालात, रिअल इस्टेट कंपनी गेरा डेव्हलपमेंट्स प्रायव्हेट लिमिटेडने 2024 कॅलेंडर वर्षात विक्री 5 टक्क्यांनी घसरून 90,127 युनिट्सवर आल्याचे निदर्शनास आणले आहे. अहवालात म्हटले आहे, घरांच्या किमतीतील वाढ सलग 5 व्या वर्षी सुरूच राहिली. आधीच वाढलेल्या आधारावर, संपूर्ण शहरात सरासरी दर 10.98 टक्क्यांनी वाढून 6,590 रुपये प्रति चौरस फूट इतका सर्वकालीन उच्चांक झाला.

याआधीची 2022 मधील 1.03 लाख घरांची विक्री 2023 मध्ये सुमारे 94,500 घरांवर आणि 2024 मध्ये जवळपास 90,000 घरांपर्यंत खाली आली आहे, असे अहवालात म्हटले आहे. नवीन लाँच देखील 2024 मध्ये 91,400 युनिट्सवर आले आहेत, जे मागील वर्षातील 96,350 युनिट होते. 2022 मध्ये 1.03 लाख नवीन घरे जोडली गेली होती. (हेही वाचा: Pune Metro to Extend Operating Hours: पुणे मेट्रो रात्री उशीराही धावणार, जानेवारी 2025 पासून वाढवले कामाचे तास)

गेरा डेव्हलपमेंट्सचे व्यवस्थापकीय संचालक रोहित गेरा म्हणाले, गेल्या पाच वर्षांमध्ये किमती सतत 40 टक्क्यांनी वाढल्या आहेत. बाजारातील स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी विकसकांनी पुरवठा आणि किंमतींच्या संतुलित दृष्टिकोनाला प्राधान्य दिले पाहिजे.’ अहवालावर भाष्य करताना, रिअल इस्टेट सल्लागार इन्फ्रामंत्राचे संचालक आणि सह-संस्थापक गरवीत तिवारी म्हणाले, घरांच्या विक्रीतील घट आणि मालमत्तेच्या किमती वाढणे ही बाब, 2024 मध्ये पुण्यासह प्रमुख शहरांमध्ये दिसली आहे. मोठ्या घरांची मागणी आणि कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने शहरातील सर्वसाधारणपणे घरांच्या किमती वाढल्या आहेत. पुणे हे कॉर्पोरेट क्रियाकलापांचे केंद्र बनत आहे ज्यामुळे घरांची मागणी वाढत आहे.